जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत निवडणूक आयोगाने शनिवारी तेथील विविध राजकीय पक्षांसमवेत चर्चा केली. जम्मू-काश्मीरला अलीकडेच महापुराचा तडाखा बसला होता. आता स्थिती पूर्वपदावर येत असल्याने आयोगाने चर्चा केली.
महापुरामुळे मोठय़ा प्रमाणावर हानी झाली असल्याने निवडणुका घेण्यासाठी सध्या वातावरण पोषक नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सने मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आयोगातील अन्य सर्व सदस्यांना सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार या वर्षांअखेपर्यंत निवडणुका घेण्यास सत्तारूढ काँग्रेस आणि पीडीपीसह अन्य विरोधकांनी अनुकूलता दर्शविली.  काश्मीर खोऱ्यातील ४६ पैकी किमान २५ विधानसभा मतदारसंघात महापुरामुळे मोठे नुकसान झाले असल्याने सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करावी लागली.