मतदानासाठी गेल्यानंतर निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, पोलिसांनी सौजन्यपूर्ण संवाद साधत मतदान कक्षापर्यंत पोहोचविले, किंवा स्वच्छता आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजलेले मतदान केंद्र दृष्टीस पडले तर.. हो, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी निवडक मतदान केंद्रांमध्ये अशा पद्धतीने मतदारांचे स्वागत केले जाणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांचा उत्साह वाढावा या उद्देशाने कुलाब्यापासून धारावीपर्यंतच्या १० मतदारसंघांतील १८ मतदान केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करूनही मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत नसल्याचे गेल्या काही निवडणुकांमध्ये आढळून आले आहे. तेव्हा मतदारांनी मोठय़ा संख्येने मतदान करावे यासाठी यावेळी निवडणूक आयोगाने ही अभिनव योजना जाहीर केली आहे.
या योजनेनुसार मतदान केंद्र साफसफाई करून स्वच्छ करण्यात येईल. आकर्षक रांगोळ्यांनी केंद्र सजविण्यात येणार आहे. तसेच मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाशी सौजन्याने वागण्याचे आवाहन केंद्रावर तैनात असणारे निवडणूक अधिकारी-कर्मचारी, तसेच पोलिसांना करण्यात येणार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडेही देण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकारी शैला ए. यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ही असतील आदर्श मतदानकेंद्रे
कुलाबा मतदारसंघातील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (मतदान केंद्र क्रमांक १३८); मुंबादेवीतील चंदनबेन शहा सेवा मंदिर हॉल (९), अमीन हायस्कूल तळमजला (१०६); मलबार हिलमधील सर कासवजी हायस्कूल (५५); भायखळ्यातील कम्युनिटी हॉल, आरबीआय क्वार्टर्स (१७९ व १८०); शिवडीमधील होली क्रॉस हायस्कूल (१ ते १२), अवर लेडी ऑफ फातिमा हायस्कूल (६० ते ६२), साईबाबा पथ म्युनिसिपल शाळा (१६१ ते १७१), ना. म. जोशी मार्ग म्युनिसिपल मराठी शाळा क्र. २ (१७९ ते १८९); वरळीतील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल (५, ६, ७); माहीममधील वनिता समाज सेवा समिती हॉल (१५०), दादर को-ऑप हौसिंग सोसायटी (१९८, १९९); वडाळ्यातील दोस्ती एकस्र (५१, ५१ ए); सायन कोळीवाडामध्ये श्री  वल्लभ शिक्षण संगीत विद्यालय (६१); धारावीमधील धारावी ट्रान्झिट कॅम्प (४५) ही १८ मतदान केंद्रे निवडणूक आयोगाच्या योजनेमुळे ‘आदर्श मतदान केंद्र’ बनणार आहेत.