News Flash

लक्ष्मीदर्शनाचा सुकाळ

ठाणे जिल्ह्य़ात निवडणूक यंत्रणेने केलेल्या आतापर्यंतच्या कारवाईत ९६ लाख २५ हजार ७२० रुपये जप्त झाले आहेत. रविवारी रात्री त्यात आणखी तीन लाखांची भर पडून हा

| October 14, 2014 03:14 am

ठाणे जिल्ह्य़ात निवडणूक यंत्रणेने केलेल्या आतापर्यंतच्या कारवाईत ९६ लाख २५ हजार ७२० रुपये जप्त झाले आहेत. रविवारी रात्री त्यात आणखी तीन लाखांची भर पडून हा आकडा एक कोटी रुपयांवर गेला. त्याचप्रमाणे आचारसंहिता भंगाचे ३५ गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या देखरेखीसाठी जिल्ह्य़ात एकूण १३ हजार ६६२ पोलीस कर्मचारी आणि एक हजार २३ गृहरक्षक दल जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
सोलापुरात सहा लाख जप्त
सोलापुरात सोमवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपल्यावर लक्ष्मीदर्शन खुले झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी शहरातील एका हॉटेलवर छापा घातला. तेथे काँग्रेसच्या एका नेत्याकडून सहा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. आंध्र प्रदेशातील लोधी समाजाचे नेते प्रेमकुमार लोधा हे हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्यांच्यामार्फत मतदारांना पैसे वाटले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकला असता रोख रक्कम हाती लागली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी मात्र ही सापडलेली रक्कम वाटण्यासाठी नव्हे तर पक्षकार्यासाठी वापरली जात असल्याची सारवासारव केली.
द्रूतगती मार्गावर ४० लाख जप्त
मुंबई- पुणे द्रूतगती मार्गावर ४० लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना रायगड पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. कृष्णन सदापल्ले आणि सतीश पाटील अशी या दोघांची नावे असून हे दोघेही सांगली जिल्ह्य़ातील मांगळे गावातील रहिवासी आहेत. कृष्णनकडे २५ तर सतीशकडे १५ लाख रुपये होते. द्रूूतगती मार्गावरून जाणाऱ्या एका बसमधून ४० लाख रुपयांची रोकड नेली जाणार असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना मिळाली होती. या माहितीनंतर रायगड पोलिसांनी मुंबई- पुणे द्रूतगती मार्गावर सकाळी आठपासून खालापुर टोल नाक्याजवळ नाकाबंदी सुरू केली होती. सकाळी ११च्या सुमारास मुंबईहून कोल्हापुरकडे जाणाऱ्या हिरकणी एसटी बसमधील दोघांकडे रक्कम सापडली.

सव्वा पाच कोटी परत केले
पुणे जिल्ह्य़ात भरारी पथक आणि पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत आठ कोटी ६५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम पकडली आहे. या रकमेच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यापैकी पाच कोटी २२ लाख ६३ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. तीन कोटी ४२ लाख ६९ हजार रुपयांबाबत व्यवस्थित कागदपत्रे सादर न केल्यामुळे ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत कागदपत्रांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 3:14 am

Web Title: election commission seized cash over rs 96 lakh in thane district
टॅग : Election Commission
Next Stories
1 ‘सोशल प्रचारा’वर कोटय़वधींची उधळण
2 मोदींचे बंधूही निवडणूक प्रचारात
3 पेडन्यूजप्रकरणी सोलापुरात प्रणिती शिंदे, भालके, परिचारक यांना नोटीस
Just Now!
X