कर्मचाऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या खासगी आस्थापनांच्या चालक-मालकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने धडक पथकांची स्थापना केली आहे. पालिकेच्या दुकाने व आस्थापना कार्यालयात याबाबत तक्रार केल्यास तात्काळ धडक पथकामार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी १५ ऑक्टोबर रोजी भरपगारी जाहीर सुट्टी देण्यात आली आहे. विविध आस्थापना, दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाटय़गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्यांनाही ही सुट्टी लागू करण्यात आल्याचे याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेऊन अधिसूचनेचा भंग करणाऱ्या चालक-मालकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालिकेने धडक पथकांची स्थापना केली आहे.
संपर्क साधा
मतदानाच्या हक्कापासून वंचित केल्या प्रकरणी दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख निरीक्षक ए. डी. गोसावी, दुकाने व आस्थापना कार्यालय, चौथा मजला, भीमाबाई राणे महापालिका शाळा इमारत, गिरगाव येथे अथवा दूरध्वनी क्रमांक २३६१६९६१, २३६३५३९०, मोबाइल क्रमांक ९७६९१४०७६३ वर संपर्क साधावा. तसेच कामगार आयुक्तांशी दूरध्वनी क्रमांक २६५७२९२५, २६५७०८१५ वर संपर्क साधून तक्रार करता येईल.
* या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. परंतु गोंदिया जिल्ह्य़ातील खामगाव  व गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी, अहेरी या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील.
* राज्यात प्रथमच १३ विधानसभा मतदार संघातील ३,९४२ मतदान केंद्रांवर ‘व्होटर व्हेरिफीकेशन पेपर ऑडिट ट्रायल’ ( व्हीव्हीपॅट)च्या माध्यमातून मतदान होणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम,औरंगाबाद पूर्व, अमरावती व अचलपूर, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व, तसेच चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अहमदनगर शहर व भंडारा या मतदार संघात व्हीव्ही पॅट लावण्यात येणार असल्याने मतदाराला आपण ज्याला हवे त्यालाच मतदान केले आहे ना हे लगेच कळणार आहे.