विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून राज्यात भाजपप्रणीत सत्ता स्थापन होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली, तरीही निरनिराळ्या क्षेत्रांतील मंडळींचे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सत्र सुरूच आहे. आता ठाणे-मुंबईतील कुख्यात गुंडांचे कर्दनकाळ ठरलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रेही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांसोबत त्यांची चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे समजते. या वृत्तास रवींद्र आंग्रे यांनीही दुजोरा दिला आहे.
पोलीस दलात कार्यरत असताना रवींद्र आंग्रे यांनी मुंबईत ३३ तर ठाण्यात २१ असे एकूण ५४ एन्काऊंटर केले आहेत. डोंबिवलीसह आसपासच्या शहरात दहशत निर्माण करणाऱ्या सुरेश मंचेकर आणि त्याच्या टोळीचा खात्मा रवींद्र आंग्रे यांनी केला होता. मध्यंतरी, व्यवसायाच्या वादातून झालेल्या आरोपांमुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पोलीस सेवेपासून काही काळ दूर राहावे लागले होते. मात्र, न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल देताच आंग्रे पुन्हा पोलीस सेवेत रुजू करण्यात आले होते. दरम्यान, आंग्रे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांनी आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, रवींद्र आंग्रे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वृत्तास दुजोरा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा चांगली असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला पकडून तेच भारतात आणू शकतील, अशी आशा आहे. त्यामुळे भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.