वसई मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी अशोक मांद्रे यांच्या घरात मतदान यंत्रे सापडल्याच्या घटनेने बुधवारी सकाळी मोठी खळबळ उडाली होती. मात्र, ही मतदानयंत्रे राखीव असून याप्रकरणात काहीही गैर नसल्याचे स्पष्टीकरण स्थानिक तहसिलदारांकडून देण्यात आले आहे. वेळ पडल्यास कोणतीही गैससोय होऊ नये, यासाठी अशाप्रकारची राखीव मतदान यंत्रे बाळगली जातात असे तहसीलदरांकडून सांगण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी अशोक मांद्रे यांनी आपल्या राहत्या घरी ही मतदान यंत्रे ठेवली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या पत्नीसह शासकीय कार्यालयात घेऊन ते निघाले होते. त्याचवेळी वसईचे आमदार विवेक पंडीत यांना गैरप्रकाराचा संशय आल्यामुळे त्यांनी मांद्रे यांच्या घरी धाव घेत निवडणूक निर्णय अधिका-यांना फोन करून याविषयी कळवले होते. त्यानंतर तहसिलदारांनी चारही यंत्रांचा पंचनामा करून, ही यंत्रे ताब्यात घेतली होती. निवडणूक प्रशासनाकडून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, विवेक पंडीत यांनी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.