News Flash

पहिला दिवस शुभेच्छा अन कामकाजाचा..

विरोधी पक्षातील मोठय़ा आवेशाने धडाडणारी मुलुखमैदान तोफ म्हणून ओळख असलेले देवेंद्र फडणवीस शुक्रवारी ‘सीएम साहेब’ झाले. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडल्यावरही सह्य़ाद्री या पंचतारांकित शासकीय अतिथीगृहात

| November 2, 2014 03:39 am

विरोधी पक्षातील मोठय़ा आवेशाने धडाडणारी मुलुखमैदान तोफ म्हणून ओळख असलेले देवेंद्र फडणवीस शुक्रवारी ‘सीएम साहेब’ झाले. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडल्यावरही सह्य़ाद्री या पंचतारांकित शासकीय अतिथीगृहात राहण्यासाठी न जाता ‘मॅजेस्टिक’ आमदार निवासातील आपल्या नेहमीच्याच निवासस्थानी ते राहण्यासाठी गेले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानाची साफसफाई व आवश्यक दुरुस्ती होईपर्यंत ‘सीएम’ साहेब आमदार निवासातच मुक्कामाला असल्याने पोलिसांना तेथील सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. सीएम साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपासूनही मोठी गर्दी होती. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यावर व न्याहारी आटोपल्यावर फडणवीसांनी सकाळी साडेनऊच्या सुमारासच सह्य़ाद्री अतिथीगृह गाठले.
मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन शिरस्त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. त्यानंतर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व अन्य काही अधिकाऱ्यांची चर्चा केल्यावर मंत्रिमंडळाची बैठक सकाळी अकराच्या सुमारास सुरु झाली. चार खात्यांचा आढावा घेण्यासाठी तब्बल साडेचार-पाच तास लागले. प्रत्येक खात्याने सद्यपरिस्थिती व आव्हाने याचे सादरीकरण केले. मंत्रिमंडळ बैठक आटोपताच अनेक आयएएस, आयपीएस, पोलिस महासंचालक आदी अधिकाऱ्यांशी भेटीगाठी, चर्चा व शुभेच्छांचा वर्षांव सुरु होता. त्यातच नगर जिल्ह्य़ात दलित अत्याचाराची घटना घडल्याने त्यातील मृतांच्या नातेवाईकांना घेऊन एक शिष्टमंडळ भेटायला आले होते. त्यांना ‘सीएम’ साहेबांनी दिलासा दिला व संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचनाही दिल्या. मंत्रिमंडळाची बैठक आटोपून मुख्यमंत्र्यांचा ताफा अतिथीगृहाहाबाहेर पडला.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ चैत्यभूमी, स्वा.सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत सहकारी मंत्री विनोद तावडेही होते. नंतर पुन्हा साडेसहाच्या सुमारास ते सह्य़ाद्री अतिथीगृहात परतले.
सायंकाळी साडेसहानंतर तब्बल दहा चित्रवाणी वाहिन्यांसोबत मुलाखती सुरु झाल्या. त्याआधी शुभेच्छा देणाऱ्यांचा गराडा पडलेलाच होता. त्या शुभेच्छांचा स्वीकार करीतच अतिथीगृहातील ‘स्टुडिओ’ मध्ये सीएम साहेब दाखल झाले, अन् मग सुरु झाला मुलाखतींचा सिलसिला.. अथकपणे.. अगदी पहाटेपर्यंत !
देवेंद्र उवाच..
आधी विरोधी पक्षात होतो, आता सरकार चालविण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे दडपण निश्चितच आले आहे. गेली १५ वर्षे जे सरकार होते, त्यांच्याविरुध्द जनतेची नाराजी होती व त्यांनी ज्या पध्दतीने भ्रष्ट कारभार केला, त्यामुळे त्यांना लोकांनी सत्तेतून घालविले. आता जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या असून त्या जबाबदारीचे ओझे निश्चितच आहे.
शपथविधी पार पडल्यावर आजचा कामकाजाचा पहिलाच दिवस. त्यामुळे माझ्यासह मंत्रिमंडळातील सर्वच सहकारी कामाला लागले आहेत. आम्ही सकाळी काही भेटीगाठी झाल्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून सह्य़ाद्री अतिथीगृहात चार खात्यांचा आढावा घेतला. अर्थ, उर्जा, गृह व कृषी खात्याच्या प्रमुखांनी मंत्रिमंडळापुढे सादरीकरण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 3:39 am

Web Title: first day of devendra fadnavis in office
टॅग : Devendra Fadnavis
Next Stories
1 मंत्र्यांनीही कित्ता गिरवला
2 मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ प्रवेशाला पुढच्या आठवडय़ातील मुहूर्त!
3 सेनेशी चर्चा होत असल्याने खातेवाटप थांबले
Just Now!
X