अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा विचार शनिवारी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बैठकीनंतर याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेश पोलीस उप महानिरीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणातील दोषींना पकडण्याच्या प्रयत्नांना वेग येण्याची शक्यता आहे.
 शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. मात्र, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या खाटेवाटपासंदर्भात या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. भाजपच्या आठ कॅबिनेट आणि दोन राज्य मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तसे संकेतही दिले होते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर दर बुधवारी होणाऱ्या विधिमंडळ बैठकीचा दिवस बदलून ही बैठक आता मंगळवारी ठरवण्यात आले. याशिवाय, राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या गृह, अर्थ आणि कृषी विभागचा अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. संबंधित विभागाच्या सचिवांनी अहवालाच्या माध्यमातून प्रत्येक विभागातील परिस्थितीविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली.