विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काथ्याकूट सुरू असतानाच राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतात की काही जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही काँग्रेस भाजप किंवा शिवसेनेशी हातमिळवणी कायम ठेवतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगर, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला दूर ठेवत भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर केली होती. राष्ट्रवादीला प्रत्युत्तर म्हणनू काँग्रेसने उस्मानाबादमध्ये शिवसेनेबरोबर तर कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर हातमिळवणी करीत सत्ता हस्तगत केली होती. सहा जिल्हा परिषदा वगळता उद्या राज्यातील बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होत असताना आघाडी कायम राहते का, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि भाजपबरोबर हातमिळवणी करू नये, अशा सूचना आम्ही संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीकडूनच काँग्रेसला टाळण्याकरिता भाजप वा शिवसेनेशी हातमिळवणी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.
नगरमध्ये दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्यावर भर दिला आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती. यवतमाळमध्ये अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी काँग्रेसची त्याला तयारी नाही. आघाडीत जागावाटपावरून ताणाताणी सुरू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते यावर आघाडीचे भवितव्य बरेच अवलंबून राहणार आहे.