दुपारची टळटळीत उन्हाची वेळ होती. हडपसर परिसरातील एका मतदानकेंद्रावर आईबरोबर तिच्या मागे लागून एक चिमुरडी देखील दाखल झाली. शांतता आणि तणावाचे वातावरण. रांगेतून पुढे सरकताना खांद्यावरील चिमुरडीची भिरभिर नजर या ‘लोकशाही’ घडवणाऱ्या मतदान व्यवस्थेवर जात होती. मतदान स्लिप दाखवली गेली, सही झाली आणि आईच्या बोटाला शाई लावण्याची वेळ आली. पण याच वेळी त्या चिमुरडीने देखील तिच्या बोटाला शाई लावण्याचा आग्रह धरला. तिचा हा बालहट्ट निवडणूक कर्मचाऱ्यांनीही पुरवला!
 हडपसरमधील एका मतदानकेंद्रावर घडलेला हा किस्सा. मतदान करण्यासाठी आईकडे हट्ट करणाऱ्या त्या चिमुरडीच्या इवल्याशा बोटावर निवडणूक कर्मचाऱ्याने शाईची रेघ ओढली. आईपाठोपाठ मुलगी पुढे सरकली. आईने हवे ते बटण दाबत मतदान केले. पण या वेळी तो आवाजही झाला आणि दिवाही चमकला. हा सारा खेळ त्या खांद्यावरच्या मुलीनेही पाहिला आणि तिलाही या ‘खेळण्या’तील गंमत स्पर्शून गेली. आता तिने हे बटन दाबण्याचा हट्ट धरला. आई मुलीला घेऊन बाहेर जाऊ लागली, तशी ही मुलगी रडून नाराजी प्रगट करू लागली. लोकशाहीच्या मंदिरातील हा अनोखा खेळ पाहून निवडणूक कर्मचारी, पोलीस आणि सर्वच पक्षांच्या प्रतिनिधीनांही हसू फुटले. आईचा मुलीला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न तर खांद्यावरील मुलीचा तो ‘आवाज’ पुन्हा एकदा अनुभवायचा हट्ट. अखेर निवडणूक कर्मचारी, पोलीस आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी एकमताने तिला ते बटन दाबू देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रांगेतील मागच्या मतदाराच्या हातात त्या चिमुरडीला सोपवले गेले. या मुलीला घेत तो मतदार मतदान कक्षात गेला. त्या मुलीचा हात पकडत त्याने त्याला हव्या त्या उमेदवाराच्या नावापुढचे बटन दाबले. त्याचे मतदानाने आणि त्या चिमुरडीचे त्या आवाजाने समाधान झाले. एखादा उमेदवार विजयी झाल्याच्या थाटात सारे मतदान केंद्र हास्यकल्लोळात बुडाले तर ती चिमुरडी टाळय़ा वाजवू लागली.