राष्ट्रवादीने सादर केलेल्या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. राष्ट्रवादीला अपेक्षित असलेले संख्याबळ मिळणार असेल तरच पुढील चर्चा होईल, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात ढकलला.
निम्म्या जागा मिळाव्यात ही आमची मागणी आहे. १२४ जागांचा प्रस्ताव मान्य नाही. त्यानंतर किती वाढीव जागा देणार यावर काँग्रेसकडून काहीच माहिती दिली जात नाही. आघाडी टिकावी ही आमची भूमिका आहे. पण शेवटी संख्याबळावर सारे अवलंबून असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी किती जागा स्वीकारण्यास तयार आहे, या प्रश्नावर, आधी काँग्रेसकडून प्रतिसाद आल्यावरच पुढील चर्चा करता येईल, अशी भूमिका पटेल यांनी मांडली.  पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी पक्षाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात काँग्रेसबरोबरील आघाडीबाबत चर्चा केली जाईल. काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास चर्चेची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या सायंकाळी जाहीर केली जाईल, असेही पटेल यांनी सांगितले.