News Flash

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अवघड स्थिती

गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया अशा तीन जिल्ह्य़ांत विभागल्या गेलेल्या या मतदारसंघात लोकसभेत भाजपने मिळवलेला निर्णायक विजय काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरला आहे.

| September 27, 2014 03:13 am

गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया अशा तीन जिल्ह्य़ांत विभागल्या गेलेल्या या मतदारसंघात लोकसभेत भाजपने मिळवलेला निर्णायक विजय काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरला आहे. मात्र, भाजप-सेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे सहाही विधानसभा मतदारसंघांत आता चौरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.
नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव व आदिवासीबहुल अशा या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या तीन जागा आदिवासींसाठी, तर एक अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मोठय़ा संख्येत असलेला आदिवासी मतदार हा आजवर काँग्रेसच्या हक्काचा म्हणून ओळखला जात होता. भाजपने आता ही ओळख जवळजवळ पुसून टाकली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर चेहरे बदलाचे मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात सहापैकी चार आमदार काँग्रेसचे, तर भाजपचा केवळ एक आमदार आहे. या मतदारसंघात शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात प्रथमच प्रचार करणार आहे, तर राष्ट्रवादी व काँग्रेससुद्धा येथे एकमेकांचे उखाळेपाखाळे काढणार आहेत. पाच वर्षांपूर्वी एक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीसमोर या वेळी आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील पालकमंत्री असूनसुद्धा राष्ट्रवादीची स्थिती अतिशय वाईट आहे.
गडचिरोली
लोकसभेत दणकून पराभूत झालेले काँग्रेसचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना पक्षाने उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी सिरोंचा येथे वास्तव्य असलेल्या सगुणा तलांडी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेत पराभूत झालेल्यांना विधानसभेत हरवायचे, ही या मतदारसंघाची परंपरा कायम आहे. येथे भाजपकडून एकदम नवीन चेहरा डॉ. देवराव होळी रिंगणात येण्याची शक्यता आहे, तर शिवसेना वासुदेव शेडमाके यांना व राष्ट्रवादी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्याचे निश्चित आहे.
आरमोरी
लोकसभेत ४२ हजारांनी पीछेहाट झाल्याने काँग्रेसचे आमदार आनंदराव गेडाम यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे विकासापासून दूर असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेजवळ सक्षम उमेदवार नाही. त्याचा फायदा घेत भाजप हा मतदारसंघ लाटण्याच्या तयारीत आहे. सेनेची येथे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, तर भाजपची कृष्णा गजबे यांना उमेदवारी निश्चित आहे. गडचिरोली जिल्ह्य़ाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या ‘सावकार’ गटाचे राजकारण याच क्षेत्रातून चालते. या वेळी सावकारांची सरशी होते, भगवा फडकतो की कमळ फुलते, हे बघणे मनोरंजक ठरणार आहे. भाजपचीच निर्मिती असलेल्या युवाशक्ती संघटनेचा प्रभाव येथे आहे.
चिमूर
लोकसभेत भाजपला २५ हजारांची आघाडी मिळल्याने भाजपच्या वर्तुळात आनंदाचे, तर काँग्रेस, सेना व राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसने माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजप व युवाशक्ती, असे नवे समीकरण तयार झाले आहे. विदर्भातील बडे कंत्राटदार, अशी ओळख असलेले भाजपचे आमदार मितेश भांगडियांना या वेळी मुलाला आमदार करायचे आहे. यानिमित्ताने भाजपत सुरू होणारा भाई-भतिजा वाद कसे वळण घेतो, यावर येथील चित्र अवलंबून आहे. चिमूर जिल्ह्य़ाची निर्मिती हा येथील अस्मितेचा प्रश्न आहे. ठाण्याचे विभाजन करताना आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला तरी भाजपला फार फटका बसणार नाही, अशी स्थिती आहे. सेना येथून एखाद्या भाजप बंडखोराच्या गळ्यात माळ टाकण्याच्या प्रयत्नात आहे.
ब्रह्मपुरी
लोकसभेत ३० हजारांची आघाडी मिळाल्याने भाजपचे आमदार अतुल देशकर सध्या निश्चिंत आहे. गेल्या वेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊनही देशकर निसटत्या फरकाने विजयी झाले होते. त्या वेळी बंड करणारे संदीप गड्डमवार आता राष्ट्रवादीत आहेत. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली तर ती चुरशीची होईल, यात शंका नाही. आघाडीत फाटाफूट झाल्याने काँग्रेसने माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना चिमूरवरून स्थलांतरित केले आहे. मात्र, ब्रह्मपुरी ही वडेट्टीवारांसाठी राजकीय आत्महत्या ठरण्याची चिन्हे आहे.
अहेरी
गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून येत नंतर काँग्रेसची सोबत करणारे दीपक आत्राम यांची अवस्था आता घर का ना घाट का, अशी झाली आहे. एटापल्ली पंचायत समितीचे माजी सभापती मुक्तेश्वर गावडे गुरुजी यांना काँग्रेस रिंगणात उतरविणार आहे. भाजपने येथे युवाराजे अंबरीश आत्राम यांचे नाव निश्चित केले आहे. नक्षलवाद्यांचा सर्वाधिक हिंसाचार हा मतदारसंघ अनुभवतो. राष्ट्रवादीकडून पुन्हा शिकार प्रकरणात वादग्रस्त ठरलेले धर्मरावबाबा आत्राम रिंगणात उतरणार आहे, तर शिवसेनेला येथे उमेदवाराची शोधाशोध करावी लागत आहे.
आमगाव
लोकसभेत २६ हजार मतांनी मागे पडल्याने काँग्रेसचे आमदार रामरतन राऊत यांनाच संधी द्यायची की नवा चेहरा समोर करायचा, असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. वडेट्टीवार मंत्री असल्याचा फायदा राऊतांना झाला. या वेळी भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढत असल्याने स्थिती वेगळी आहे. नक्षलवाद्यांच्या अस्तित्वामुळे विकास नाही. परिणामी, नाराज मतदार युतीला जवळ करतीलही, पण येथे भाजप वा सेनेजवळ तगडा उमेदवार नाही. सरकारविरोधी लाट या एकाच समीकरणावर येथे भाजप नेते अवलंबून आहेत.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:13 am

Web Title: gadchiroli hard for congress and ncp
Next Stories
1 नवी संस्कृती
2 ‘आप’मतदार जागृती करणार!
3 ‘केरळमधील राजकीय हिंसाचार थांबवा ’
Just Now!
X