रत्नागिरी जन्मभूमी असलेल्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा उद्घोष केला होता. त्यानुसार स्वराज्य मिळाले. आता सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे म्हटले पाहिजे. त्यादृष्टीने कोकणच्या विकासासाठी भाजपला संपूर्ण बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता मोदी यांच्या भाषणाने झाली. येथील चंपक मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, मी कोकणाकडे पाहतो तेव्हा हा प्रदेश मागासलेला का राहावा, असे कोडे पडते. येथे गेली पंधरा वष्रे राज्य केलेले काँग्रेस आघाडीचे सरकार त्यासाठी जबाबदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागतिक व्यापार वाढवण्यासाठी कोकण किनारपट्टीवर आरमार उभे केले. त्यांच्या दूरदृष्टीच्या एक टक्का क्षमता जरी सरकारमध्ये असती तरी ही परिस्थिती झाली नसती, अशी टीका मोदी यांनी केली.
भारताला जगामध्ये प्रतिष्ठा कमी होती म्हणून कोकणातील हापूस आंबा जगाच्या बाजारपेठेत नाकारण्यात आला, असे मत व्यक्त करून मोदी म्हणाले की, आता हे चित्र बदलले आहे. सुमारे तीस वर्षांनंतर देशात स्पष्ट बहुमत असलेले सरकार आले आहे. माझ्या अमेरिका दौऱ्यातही त्याचा अनुभव आला. कोकणात प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे मासेमारी, पर्यावरणस्नेही पर्यटन, शिवकालातील किल्ल्यांचे पर्यटन असे प्रकल्प यशस्वी होऊ शकतात. पण त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्यास हा विकास साधण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली. राज्यातील अन्य ठिकाणी झालेल्या प्रचारसभांप्रमाणे येथेही मराठी भाषेत सुरुवात करून मोदी यांनी उपस्थितांची दाद मिळवली. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांनी रत्नागिरी ही सामाजिक समरसतेची प्रयोगभूमी केली होती, अशा शब्दात गौरव केला.  
काँग्रेसची घराणेशाही संपवा
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची घराणेशाही संपवण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची उल्लेख न करता ते म्हणाले की, राजे-संस्थानिकांच्या काळात नव्हती अशी घराणेशाही काँग्रेस राजवटीमध्ये बघायला मिळते. वडील मंत्री असतील तर मुलगा ‘सुपरमंत्री’ असतो. सर्व पदे कुटुंबातच वाटून घेतली जातात. ही घराणेशाही संपवून कोकणच्या विकासासाठी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याची गरज आहे.