‘लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय केवळ मोदी लाटेला देणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे व तो आम्ही कदापि सहन करणार नाही, असे परखड प्रतिपादन शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे.
शिवसेना-भाजप यांची सुमारे २५ वर्षांची युती आज तुटीच्या उंबरठय़ावर असून उभयपक्षी असलेली दरी वाढत चालली आहे. पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपची पीछेहाट झाल्याचे दिसून आल्यावर शिवसेना नेत्यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने आता आत्मचिंतन करुन जमिनीवर यावे, असे मत व्यक्त करीत कदम म्हणाले, मोदी यांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे व त्यांचा अवमान आम्ही करणार नाही. मात्र केवळ त्यांच्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळाले, असे म्हणणे हा शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा अवमान आहे. शिवसेनाप्रमुखांनी गेली अनेक वर्षे शिवसेना राज्यात रुजविली व वाढविली. त्यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यामुळे लोकसभेच्या यशात शिवसेनाप्रमुख व शिवसेनेचा वाटाही महत्वाचा आहे.  ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी युती घडविली व ती राखली. ते आज हयात नसल्याने त्यांनी ठरविलेले जागावाटपाचे सूत्र लगेच मोडून उद्धव ठाकरे यांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही सर्वजण उद्धवजींच्या पाठीशी ठाम उभे आहोत, असे कदम यांनी स्पष्ट केले.