भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशातील अनेक सर्वपक्षीय नेत्यांपुढे भाजपकडून ‘मराठी बाणा’ दाखविला जाणार आहे. वानखेडे मैदानात भव्यदिव्य समारंभ होणार असून विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांपुढे सत्तेचे ‘कमळ’ महाराष्ट्रात कसे फुलले, याचे सादरीकरण केले जाणार आहे. शपथविधी समारंभात भाषण ठेवता येत नाही, या कारणास्तव पंतप्रधानांच्या भाषणाचा विचार रद्द करण्यात आला आहे.
मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मराठी-गुजरातीचा वाद निर्माण केला होता. या पाश्र्वभूमीवर भाजपकडून अशोक हांडे निर्मित ‘मराठी बाणा’ चे सादरीकरण शपथविधी कार्यक्रमाआधी केले जाणार आहे. सुंदर व भव्यदिव्य सजावटीसाठी प्रसिध्द असलेले नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे शपथविधी व्यासपीठ व मैदानावरील सजावटीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सात ते जास्तीत जास्त दहा मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याने केवळ वीस मिनीटांचा कार्यक्रम होईल.
क्रीडापटूंमध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अंजली भागवत, मुंबईसह राज्यातील अनेक उद्योगपती, बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, साहित्यिक, पद्मश्री व अन्य महत्वाचे पुरस्कार विजेते, देशभरातील सर्वपक्षीय नेते आदींना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. पियूष गोयल, शायना एन सी, माधव भांडारी, संचेती, केशव उपाध्ये, अतुल शहा यांच्यासह अनेक नेत्यांवर नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.