पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या २७ सभा, वृत्तपत्रे, वाहिन्या यावरून केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती आणि सोशल मीडियाचा भरमसाठ वापर करूनही भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले. सत्तास्थापन करायची असेल, तर भाजपला शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस यापैकी एका प्रादेशिक पक्षाची मदत घ्यावीच लागेल, असे चित्र आहे. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत आणि भाजपसोबतची युती तुटल्यानंतरही शिवसेनेने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा मिळवत भाजपला खिंडीत पकडले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली असली, तरी मतदारांनी या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्रितपणे सत्ता स्थापन करावी, असाच कौल दिला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या दोन्ही पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे.
जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला राज्यात एकहाती सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री कोण यावरून चर्चा सुरू झाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि पंकजा मुडे-पालवे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून चुरस होती. या सर्वांनीच मुख्यमंत्रिपदासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून आपली दावेदारी करण्यास सुरुवातही केली होती. मात्र, एकहाती सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न यंदातरी स्वप्नच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भाजपला कोणत्यातरी एका प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊनच पुढे जावे लागेल. आता भाजप शिवसेनेला सोबत घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेने यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना आम्हाला मतदार स्पष्ट बहुमत देतील, असा विश्वास व्यक्त केला होता. पण तसे चित्र निवडणूक निकालांवरून दिसत नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेचे जास्त उमेदवार विजयी झाले असले, तरी त्यांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही. १९९५च्या निवडणुकीत शिवसेनेचे ७४ उमेदवार विजयी झाले होते. तो आकडाही यावेळी शिवसेनेला ओलांडता आलेला नाही.
प्रचाराच्या काळात पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसला पन्नाशीचा आकडाही ओलांडता आलेला नाही. पक्षाचे दिग्गज उमेदवार आणि प्रचारप्रमुख नारायण राणे यांना कुडाळमधून पराभवाची चव चाखावी लागली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही मतदारांनी त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे. या पक्षालाही विजयाची पन्नाशी गाठता आलेला नाही.