विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. भाजप-शिवसेना युतीपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने स्वबळ दाखवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी १५ वर्षे सत्तेत होती, मात्र बिघाडी झाल्यावर दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

आघाडी तुटण्यास आपण जबाबदार आहात, असा आरोप केला जातो. शरद पवार आघाडीला अनुकूल असताना तुम्ही विरोध केला याबद्दल तुमचे मत काय?
– आघाडी व्हावी ही माझीही इच्छा होती; पण काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. २००९ मध्ये लोकसभेत राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट जास्त जागा आल्यावर विधानसभेच्या दहा जागा आमच्याकडून काढून घेण्यात आल्या. आता आमच्या काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा आल्या होत्या. गेल्या वेळचाच निकष यंदा लावणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच आम्ही जास्त जागांची मागणी केली. त्यात काहीच चूक नव्हते. काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा वेगळे लढण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एकमताने घेण्यात आला. आघाडीवरून काका-पुतण्यांत मतभेद या बातम्या चुकीच्या आधारावर पसविण्यात आल्या.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानेच तुम्ही आघाडी तोडली, असा आरोप होतो. युती झाली झाली असती तर आघाडीही कायम राहिली असती का?
– जे झाले ते झाले. आता आघाडी तुटली आहे. राजकारणात जर-तरला काही अर्थ नसतो. भूतकाळातील गोष्टींबद्दल गिरवत राहण्यात काय अर्थ नाही. आघाडी इतिहासजमा झाली.
मुख्यमंत्रिपदाची तुमची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. २००४ मध्ये सर्वाधिक जागा निवडून आल्यावर पक्षाने मुख्यमंत्रिपद नाकारल्याबद्दल तुम्ही नाराजी अनेकदा बोलून दाखविली होती. आता राष्ट्रवादी स्वबळावर लढताना मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य आहे का?
– राजकारणात काम करणाऱ्या आणि क्षमता असलेल्या कोणीही प्रमुख पदाची महत्त्वाकांक्षा बाळगणे काहीच गैर नाही. राष्ट्रवादीत निवडून आलेले आमदार विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतात. माझी इच्छा असली तरी पक्षाच्या आमदारांनी नेता म्हणून निवड करावी लागेल. २००४ मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आल्यावर पक्षाने मुख्यमंत्रिपद स्वीकारायला पाहिजे होते, ही माझी सुरुवातीपासूनच भूमिका होती; पण पक्षश्रेष्ठींचा निर्णय हा अंतिम असतो. आम्ही वेगळे लढत असलो तरी राष्ट्रवादी नक्कीच स्वबळावर १४५चा आकडा गाठेल. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल.
आपल्यासह पक्षाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे विविध आरोप झाले. जनमानसात राष्ट्रवादीची प्रतिमा खराब झाली आहे. तरीही पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल एवढा विश्वास कसा?
– राष्ट्रवादीची प्रतिमा खराब झाली हे प्रसार माध्यमांतून रंगविले जाते. गेल्या १५ वर्षांमध्ये राष्ट्रवादीने केलेली कामे जनतेसमोर आहेत. पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या. यामुळेच पक्ष १४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, हा आपल्याला ठाम विश्वास आहे.
भाजपने केलेले आरोप खोटे आहेत, असे आपण म्हणता. मग प्रत्येक आरोपानंतर राष्ट्रवादीला बचावात्मक का व्हावे लागले?
– भाजपच्या मंडळींची भूमिका नेहमीच दुटप्पी असते. डॉ. विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते या मंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात भाजपचेच नेते पुढे होते. याच नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. आमच्याकडे असताना भ्रष्ट, त्यांच्याकडे आल्यावर स्वच्छ हे कसे काय ? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विरोधात केलेला एकही आरोप सिद्ध झाला नाही.
आपण भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप करता, पण भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी हातमिळवणी झाल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण तसेच शिवसेनेने केला आहे. निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल इथपर्यंत चर्चा सुरू झाली आहे.
आघाडी तुटताच तुम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट म्हणजेच भाजपला मदत होईल, अशी खेळी केलीत याबद्दल काय?
– आमच्यात काही छुपा समझोता असता तर भाजपच्या नेत्यांनी आमच्यावर आरोप केले नसते. अगदी काल खडसे-फडणवीस आमच्या विरोधात बोलले. भाजपबरोबर युती करण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादीला १४५ जागा मिळणार असल्याने आम्हाला कोणाची मदत लागणार नाही.
केंद्रातील सत्तेचे वेध आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे राष्ट्रवादीने आघाडी तोडली, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याबद्दल तुमचे मत काय?
– आमच्यावर पृथ्वीराज चव्हाण राक्षसी महत्त्वाकांक्षेचा आरोप करतात. मग पंतप्रधान कार्यालय म्हणजे देशाची सारी सूत्रे असलेले पद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी का आलात? राज्याचे मुख्यमंत्रिपद ही चव्हाण यांचीही महत्त्वाकांक्षा होती व तसे काँग्रेसमध्ये अनेक दिवस बोलले जायचे. आमची राक्षसी मग तुमची काय चेटकिणीची महत्त्वाकांक्षा होती का?
निवडणुकीच्या तोंडावर सर्वाधिक गळती पक्षाला लागली. मंत्री, आमदार सोडून गेले. ही परिस्थिती का निर्माण झाली?
– डॉ. विजयकुमार गावित हे काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला कंटाळून गेले. साखर कारखान्याला मदत केली नाही म्हणून बबनराव पाचपुते नाराज झाले. त्यांचा कारखाना नगर जिल्ह्य़ातील असतानाही पुणे मध्यवर्ती बँकेने मदत केली; पण पैसे फेडण्याची वेळ आली तेव्हा संतापले. उदय सामंत यांच्याबद्दल काय बोलणार. त्यांना सारी पदे दिली. घरातल्याप्रमाणे वागणूक दिली. संजय सावकारे यांचे स्थानिकांशी बिनसल्याने त्यांना उमेदवारीची साशंकता वाटत होती. सूर्यकांताताई पाटील यांना पक्षाने केंद्रात राज्यमंत्रिपद दिले. शिवसेना नेत्याच्या हत्येत नाव आल्याने किसन कथोरे चिंताग्रस्त होते. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने भाजपमध्ये गेल्यास काही फायदा होईल, हा विचार या नेत्यांनी बहुधा केला असावा.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसला किंवा त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला बचावात्मक व्हावे लागले का?
– पृथ्वीराज चव्हाण यांनी पद्धतशीरपणे ठरवून राष्ट्रवादीला लक्ष्य केले. आघाडीत मित्रपक्षांना बरोबर घेऊन जायचे असते. यूपीए सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी मित्रपक्षांना विश्वासात घेत. त्यांच्याच पक्षाचे पृथ्वीराजबाबांचे मात्र सारेच उलटे होते. स्वत:ची प्रतिमा जपण्याच्या प्रयत्नात सरकारमध्ये निर्णयच घेतले जात नव्हते. निवडणुकीच्या तोंडावर कसे सक्रिय झाले? बिल्डर आणि ठेकेदारांच्या फाइल्स कशा हातावेगळ्या झाल्या? तेव्हा कोठे गेली होती स्वच्छ प्रतिमा?
राष्ट्रवादीच्या प्रचाराचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात आले आहे?
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह सारे वरिष्ठ नेते प्रचारासाठी राज्यभर दौरे करणार आहेत. कोणी आरे केले की त्याला कारे करण्याची आपली भूमिका राहणार आहे. खोटे आरोप केल्यास लगेचच त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. खोटेनाटे आरोप सहन करणार नाही. तसेच प्रचाराची पातळी सोडणार नाही.
विदर्भ आणि मुंबईतील विधानसभेच्या एकूण ९८ जागांवर पक्ष संघटना कमकुवत असताना कशाच्या आधारे १४५ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करता?
– मुंबईत आम्ही कमकुवत आहोत हे मान्यच करावे लागेल. विदर्भात आम्ही इतके वर्षे लढत नव्हतो, त्यामुळे पक्ष संघटना वाढली नाही; पण जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला विदर्भात अनपेक्षितपणे चांगले यश मिळाले. यवतमाळ जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. अन्य जिल्हा परिषदांमध्ये संख्याबळ चांगले आहे. विदर्भात आम्ही सारी ताकद लावली आहे. प्रफुल्ल पटेल हे तेथे ठाण मांडून बसणार आहेत. विदर्भात नक्कीच चांगल्या जागा मिळतील. विदर्भात सध्या आमचे चारच आमदार होते. आता नक्कीच परिस्थिती बदलेल.