गेल्या १५ दिवसांपासून राज्यभर धडाडत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज, सोमवारी सायंकाळनंतर थंडावणार आहेत. युती-आघाडय़ा तुटल्यामुळे सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वैचारिक किंवा विकासाच्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी नेत्यांनी गाठलेली खालची पातळी यामुळेच यंदाचा प्रचार अधिक गाजला. प्रचारतोफा थंडावण्याच्या आदल्या दिवशी, रविवारीही याचेच दर्शन घडले.
निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीकाटिप्पणी ही होतच असते. पण यंदा राज्य विधानसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी ओलांडली गेली. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापासून प्रत्यक्ष मतदान यातील कालावधी कमी करण्यात आला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपासून प्रचाराला प्रत्यक्षात १३ दिवस मिळाले. प्रचाराला कमी वेळ व त्यातच जवळपास तीन दशकांनी सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रचारात एकूणच रंगत निर्माण झाली. १५ वर्षे सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यावर उभय बाजूने परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजप आणि शिवसेनेतही तोच प्रकार झाला. पंचरंगी लढतीमुळे प्रचाराची व्यापकता वाढली होती. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरामुळे भाजपला मिळालेल्या यशानंतर यंदा सर्वच पक्षांनी या माध्यमाचा दणक्यात वापर करून घेतला, तर दूरचित्रवाणीवरूनही जाहिरातींचा धडाका लावला. मात्र, विकासाचे मुद्दे मांडण्याऐवजी एकमेकांवर आगपाखड करण्यातच प्रचाराचा बहुतांश वेळ गेल्याचे दिसून आले.
  प्रचार खालच्या थराचा..
मनसेच्या उमेदवाराने बलात्कारासाठी निवडणुकीपर्यंत तरी थांबायला पाहिजे होते.
– आर. आर. पाटील

ज्या उंदराला वाघ बनविले, तोच आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या वाघाला पुन्हा उंदीर करा.
– अमित शहा यांचा शिवसेनेवर हल्ला.

महाराष्ट्र जिंकायला अफझल खानाची फौज आली आहे. भाजपच्या या फौजेला शिवसेना भुईसपाट करेल. – उद्धव ठाकरे

भाजपला पायजमा कशाला लागला, नागपूरची अर्धी चड्डी
आहे ना?
– शरद पवार

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांबरोबर काम करताना त्रास झाला. – पृथ्वीराज चव्हाण<br />पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याचे काहीही देणेघेणे नव्हते.
अजित पवार</strong>

पुढचे दहा दिवस लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. याच काळात हरामाचा पैसा गरिबाच्या पदरात पडतो. म्हणून या लक्ष्मीला नाकारू नका.
नितीन गडकरी</strong>