विधानसभा निवडणुकीत भाजपला आपल्या ताकदीवर पूर्ण बहुमत मिळेल आणि सरकार बनवण्यासाठी कुणाची मदत लागणार नाही. परंतु, गरज पडल्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मदत न घेता शिवसेनेचीच मदत घेऊ, असं भाजप नेते विनोद तावडे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.
केंद्रीय पातळीवर पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची पध्दत असली तरी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणं ही राज्याच्या राजकारणाची प्रकृतीच नाही. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री या राज्यातील जनताच ठरवेल, असं तावडे म्हणाले. भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वानेच राज्य सरकारचे सर्वाधिक घोटाळे भाजपने बाहेर काढले. परंतु, मोदींना ऐकायला जनतेला आवडतं, त्यामुळे ते राज्यातही प्रचारसभा घेतात. अशावेळी राज्य पातळीवर भाजपकडे नेतृत्त्व नाही, हा आरोप चुकीचा असल्याचं तावडे म्हणाले.

वसुंधरा राजे, मनोहर पर्रिकर, आनंदीबेन पटेल हे शिवसेनेला अफझलखानाच्या टोळीतले वाटत असतील तर महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या स्तराला गेलंय याचा अंदाज येईल. आणि असे आरोप पराभवाच्या भितीनेच केले जात असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला.
मनसेचा या निवडणुकीत २००९ च्या निवडणुकीइतका प्रभाव पडणार नाही, असंही तावडे म्हणाले. मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबाच आहे. परंतु, आत्ताचे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर अधिक भक्कम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते बोलले. बोरीवली हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय हा स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात आला आहे. निवडून आल्यावर मोदींच्या विकासाचं राजकारणावरच आमचा भर असणार आहे, असंही ते पुढे म्हणाले.