आपटी बार
निवडणुका जाहीर झाल्याने नेत्यांच्या घरात खलबतखाने सुरू झालेत, आणि खबरे अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अशा ‘आतल्या गोटा’तल्या, खबरी सूत्रांकडून मिळणाऱ्या ‘अनधिकृत’ बातम्यांचा हा ‘रतीब’
डोळ्यावरचा चष्मा काढून साहेबांनी काचा पुसल्या, आणि पुन्हा चष्मा डोळ्यावर चढवत समोरच्या कार्यकर्त्यांला त्यांनी खूण केली. कार्यकर्ता अदबीनं झुकत पुढे आला. खाली वाकून त्यानं हातातला फोटो साहेबांसमोर धरला.
‘काय आहे हे? हा काय प्रकार आहे?’.. कार्यकर्त्यांला त्यांनी जोरातच विचारलं, आणि कार्यकर्ता भेदरला.
‘साहेब, माझा काय संबंध नाय.. ते घाटकोपरचे आमदार.. त्यांचं पोस्टर हाय हे’.. तो चाचरतच म्हणाला. ‘सगळीकडं लागलीत अशी पोस्टरं.. तुमीच मागं म्हन्ला होतात, त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणून, म्हन्ताना मी आपला फोटो काढून आनला’..
‘कदम साहेबांची जागतिक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली साहेब.. त्याच्या अभिनंदनाची पोस्टरं लागलीत मतदारसंघात’.. कार्यकर्ता म्हणाला, आणि साहेबांनी आजूबाजूला बघितलं. आणखी कुणीच आसपास नाही याची खात्री करून घेतली, आणि खुणेनंच कार्यकर्त्यांला आणखी जवळ बोलावलं. तो आणखीनच घाबरला. उजवा तळवा गालावर ठेवून तो पुढे येऊन साहेबांसमोर झुकला.
‘या पोस्टरात आमचा फोटो नाही?’.. कार्यकर्त्यांच्या कानाशी साहेब पुटपुटले. कार्यकर्त्यांनं मानेनंच नाही म्हटलं. ‘आमच्या आशीर्वादानं, आमच्या प्रेरणेनं, असलं काहीही लिहिलेलं नाही?’.. साहेबांनी पुन्हा हळूच दुसरा प्रश्न विचारला, आणि उजव्या गालावरचा तळवा तसाच ठेवून कार्यकर्ता पुन्हा मानेनंच नाही म्हणाला.
‘तो नितीनपण तिकडे पोस्टर लावतोय. ‘आपला माणूस’ म्हणे.. जा माहीमला चक्कर मारून या.. बघा जरा.. त्यावर तरी आमचा फोटो टाकलाय का बघा’.. साहेब रागानंच स्वत:शीच म्हणाले, आणि कार्यकर्ता मागे सरकला.
‘या रामलीला आता आवरल्याच पाहिजेत. भाजपमध्ये जातोय म्हणे.. नितीनभाऊंना फोन लावा रे.. दरवाजे बंदच करून टाकू त्याचे’.. साहेबांचा राग आणखीनच उसळला होता. समोरच्या लँडलाईनवर रिंग वाजली, साहेबांनी फोन कानाला लावला.
‘हं’.. आवाजातला रागीट सूर तसाच ठेवून साहेब म्हणाले.
‘नितीनभाऊ मीटिंगमध्ये आहेत, ते फोन घेऊ शकत नाहीत असं त्यांचा पीए सांगतोय’.. टेलिफोन ऑपरेटरचा घाबराघाबरा आवाज कानी पडला.
‘बाळा, संजय, आदित्य, आणि आता राम.. सगळेच मैदानातून पळ काढतायत.. रामचा तर पत्ता आता कट करायचाच’.. साहेबांनी टेबलावर मूठ आपटली. ‘सगळ्या पक्षालाच जेनेटिक प्रॉब्लेम झालाय की काय’.. सिगारेटचा एक खोल झुरका घेत साहेब स्वत:शीच बोलले, आणि घाबरून झटक्यात त्यांनी इकडेतिकडे मान फिरवली. धुराबरोबरच एक सुस्कारा त्यांनी हवेत सोडला.. आसपास कुणीच नव्हतं.
तो कार्यकर्ता दरवाजाबाहेर उभा होता.. एकटाच! भिंतीला कान लावून!