भर दुपारी वीज गेली. घरात बसणं अशक्य झालं, म्हणताना चौकडी पारावर जमा झाली. एकानं डोक्यावरचं पागोटं सोडून पारावरची फरशी झटकून साफ केली. लगेच बाकीच्यांनी बैठक मारली आणि गप्पांचा फड सुरू झाला.
‘‘काय फुटला आजचा आकडा?’’. एकानं डोळे मिचकावत प्रश्न केला.
‘‘त्योच. कालचाच.. नवा आकडा आजून फुटल्याला न्हाई’’.. तत्परतेनं दुसरा म्हणाला आणि हातातल्या पेपराची घडी उलगडून त्यानं एका बातमीवर बोट ठेवलं.
‘‘एकशे यक्कावन्ला चिटकून बसल्यात’’.. तिसरा म्हणाला आणि पहिला जोरात हसला.
‘‘ह्य़े म्हंजी, गनपतीच्या देणगीची रक्कम आस्तीया तसलं झालं.. वरती रुपया हवाच’’.. तो म्हणाला आणि सगळेच फिदीफिदी हसले.
‘‘मंग आता काय म्हायुती टिकत न्हाई.. त्या बारक्या बारक्या पक्षांचं काय व्हनार?’’.. कुणी तरी निराश सुरात बोलला.
‘‘काय व्हनार म्हंजे?.. तुमी आईकलं न्हाई सकाळी?.. पाठीत खंजीर खुपसला म्हन्ला की त्यो जानकार बाबा.. बघिटला न्हाई व्हय टीव्हीवर? ऑ?’’.. डोक्यावरची टोपी तोंडावर घेऊन आडवा झालेल्या आणखी एकानं विचारलं.
‘‘न्हाई.. निगाला त्यो खंजीर भायेर.. जानकार म्हन्लं, की आमाला म्हायुती झाली तर पायजेल हाय’’.. एकानं माहिती पुरवली आणि पुन्हा सगळेच खदाखदा हसले.
चौथा कुणी तरी हातातल्या मोबाइलशी खेळत होता..
अचानक तो ओरडला.. ‘‘सापडला रे’’..
सगळ्यांनी अचंबित होऊन त्याच्याकडे बघितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उठलं होतं.
‘‘म्हायुतीला नवा पर्याय येतुया’’.. असं सांगत हातातल्या मोबाइलचा स्क्रीन त्यानं सर्वासमोर फिरवला.
कुणालाच काही कळलं नव्हतं.
मग त्यानं वाचायला सुरुवात केली.
‘‘आता हे घटक पक्ष भायेर पडनार, म्हणजे नवी घटक स्थापना होनार.. पितृपक्ष संपला’’.. तो आनंदानं ओरडलाच.
‘‘फुडं वाच’’.. एकानं वैतागल्या सुरात फर्मावलं आणि मोबाइलवाल्यानं व्हॉटसअप उघडलं..
‘‘भाजपवाल्यांसोबत ऱ्हानार म्हनं, ते राजूबाबा, म्हादेवराव, म्येटे’’..
‘‘मंग.. त्ये तं काय ठरल्यालंच व्हतं ना?.. समदी नाटकं’’.. टोपीनं झाकलेल्या तोंडातून आवाज आला.
‘‘पन नवी डेवलपमेन्टबी हाय त्येच्यात’’.. मोबाइलचा स्क्रीन बोटानं वर सरकावत त्यानं वाचायला सुरुवात केली.
‘‘आरं, मन्शेला बी घ्यायचं प्रयत्न चालल्यात त्यांचं’’.. वाचता वाचता त्याचे डोळे विस्फारले होते.
‘‘मन्शेला बी भाजपवाल्यांच्या नव्या म्हायुतीत घ्यायचं चाललंय म्हनं’’.. तो म्हणाला आणि पुन्हा त्यानं मोबाइल चारही बाजूंना फिरवला.. काहीही दिसत नव्हतं, तर डोळे बारीक करून लांबूनच मोबाइलवरची अक्षरं वाचल्यासारखं केलं.
‘‘पन, ह्य़े कसं शक्य हाय?’’.. टोपीखाली झाकलेल्या तोंडातून पुन्हा काळजीच्या सुरात आवाज आला.
‘‘का? शक्य हाय की.. राजकारनात काय, कायपन शक्य आसतंया.. राजसाहेबांनीच सांगून ठिवलंय.. हो, हे शक्य आहे’’..
मोबाइल खिशात ठेवत तो म्हणाला आणि नव्या आकडय़ाची प्रतीक्षा लांबल्याचे भाव चेहऱ्यावर आणत सारे पुन्हा खदाखदा हसले.