जम्मू-काश्मीरच्या शहरी आणि ग्रामीण भागांतील मतदानाच्या टक्केवारीत असलेली मोठी दरी कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मॉल्स, चित्रपटगृहे आदी ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिनिधी नियुक्त करून मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करण्यात येणार आहे.
जम्मूतील ११ विधानसभा मतदारसंघांत १० लाख ३७ हजार १९१ पात्र मतदारांची नोंद करण्यात आली असून, १२२५ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. गेल्या निवडणुकीत म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीत शहरी आणि ग्रामीण भागांतील मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत होती, असे जिल्हा निवडणूक अधिकारी अजितकुमार साहू यांनी सांगितले.
या वेळी राज्यातील अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्यानुसार प्रामुख्याने महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.