लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आलेल्या ‘अच्छे दिन आयेंगे’च्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदेन यांनी शनिवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. ते बीड येथे आयोजित काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलत होते. लोकसभेपूर्वी महागाईच्या नावाने ओरडणारा भाजप पक्ष सत्तेत आल्यानंतर देशातील महागाईचा दर १४ टक्क्यांपर्यंत गेला. मग, भाजपने आश्वासन दिलेले ‘अच्छे दिन’ कुठे गेले, असा सवाल त्यांनी या सभेत उपस्थित केला. याशिवाय भारतीय सीमेवरील चीन आणि पाकिस्तानच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. पंतप्रधान अहमदाबादमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्यात गुंतले असताना चीनचे हजारो सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करीत होते.
तर दुसरीकडे, भारत-पाक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलावले गेले. मात्र, पाककडून भारतीय सीमेवर सातत्याने घुसखोरी आणि गोळीबार वाढत असूनही मोदी सरकार गप्पच असल्याची टीका त्यांनी केली.