महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी समाधान व्यक्त केले असून, सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्तेचा दावा करण्यासाठी आवश्यक असलेला १४५ आकडा गाठण्यासाठी भाजपला इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच अडवाणी यांनी शिवसेनेची साथ घ्यावी, असा सल्ला दिला आहे. यापूर्वीही भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना हा जुना मित्रपक्ष असून, त्यांची ताकद केवळ राज्यापुरताच आहे. शिवसेना कधीच केंद्रात सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असे वक्तव्य त्यांनी यापूर्वी केले होते. आत्ता पुन्हा एकदा भाजपच्या यशाचे कौतुक करताना त्यांनी शिवसेनेला सोबत घ्यावा, असा सल्ला दिला आहे.