विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधावार १५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालयांबरोबरच खासगी क्षेत्रातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाटय़गृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉिपग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. मात्र कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संपूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान दोन तासांची किंवा मतदानाचा हक्क बजावता येईल अशी सवलत कामाच्या वेळेत देण्याचे आदेश कामगार विभागातर्फे काढण्यात आले आहेत.