गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी सहा वाजता सांगता झाली. त्यामुळे आता महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे ती मतदानाच्या दिवसाची. युती-आघाडय़ा तुटल्यामुळे सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आणि वैचारिक किंवा विकासाच्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी नेत्यांनी गाठलेली खालची पातळी यामुळेच यंदाचा प्रचार अधिक गाजला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी सभा घेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीकाटिप्पणी ही होतच असते. पण यंदा राज्य विधानसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी ओलांडली गेली. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापासून प्रत्यक्ष मतदान यातील कालावधी कमी करण्यात आला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपासून प्रचाराला प्रत्यक्षात १३ दिवस मिळाले. प्रचाराला कमी वेळ व त्यातच जवळपास तीन दशकांनी सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रचारात एकूणच रंगत निर्माण झाली. १५ वर्षे सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यावर उभय बाजूने परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजप आणि शिवसेनेतही तोच प्रकार झाला. पंचरंगी लढतीमुळे प्रचाराची व्यापकता वाढली होती. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरामुळे भाजपला मिळालेल्या यशानंतर यंदा सर्वच पक्षांनी या माध्यमाचा दणक्यात वापर करून घेतला, तर दूरचित्रवाणीवरूनही जाहिरातींचा धडाका लावला. मात्र, विकासाचे मुद्दे मांडण्याऐवजी एकमेकांवर आगपाखड करण्यातच प्रचाराचा बहुतांश वेळ गेल्याचे दिसून आले.