राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला असल्याचे चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी आघाडीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
राज्यातील सरकार अल्पमतात आले असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झालेली आहे. त्यामुळे उर्वरित काळासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्यास सांगायचा, याचा निर्णय राज्यपालांना घ्यावा लागणार होता. मात्र, चव्हाण यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचीच दाट शक्यता निर्माण झाली आहे.