पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, आर. आर. पाटील अशा पहिल्या फळीतील बहुतांशी सर्वपक्षीय नेत्यांचा स्वत:च्या मतदारसंघांतील विजयासाठी पार घाम निघाला. ‘घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी’ अशीच अवस्था या नेत्यांची झाली होती. कारण राज्यभर प्रचार करताना अर्धे लक्ष मतदारसंघात ठेवावे लागले.
काँग्रेसच्या प्रचाराची सारी धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वहावी लागली. पण दक्षिण कराड या आपल्या मतदारसंघातील विजयाकडे त्यांना लक्ष ठेवावे लागले. बाहेर इतरत्र फिरताना अर्धे लक्ष स्वत:च्या मतदारसंघात ठेवावे लागत होते. नारायण राणे यांना तर स्वत:च्या कुडाळ मतदारसंघासह पुत्र नीतेशच्या मतदारसंघातही लक्ष ठेवावे लागत होते. शिवसेना उमेदवाराने मतदारसंघात आव्हान उभे केल्याने राणे यांना मतदारसंघात गावोगावी भेटी द्याव्या लागल्या. १९९०च्या पहिल्या निवडणुकीनंतर राणे यांना पहिल्यांदाच पाडे, गावोगावी जावे लागले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेनेने सारी ताकद पणाला लावली. युती तोडण्यात खडसे यांचा पुढाकार असल्याने शिवसेनेने खडसे यांना लक्ष्य केले. परिणामी बाहेर प्रचारासाठी फिरताना खडसे यांना आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाची खबरदारी घ्यावी लागली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासाठी बोरिवली मतदारसंघ सुरक्षित असला तरी त्यांनीही कोणताही धोका पत्करलेला नाही. गोरेगाव मतदारसंघात सेना नेते सुभाष देसाई यांनीही घरोघरी फिरावे लागले.
आर. आर. पाटील यांच्या विरोधात भाजपचे अजित घोरपडे यांनी आव्हान उभे केले. यामुळे आर. आर. आबांना गोवागावी फिरावे लागले. छगन भुजबळ आणि गणेश नाईक या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांना स्वत:च्या मतदारसंघाबरोबरच आपापल्या मुलांच्या मतदारसंघांची काळजी घ्यावी लागली. भुजबळ हे राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी अन्यत्र दौरे करीत होते, पण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करता येत नव्हते.
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघात फार काही आव्हान नसले तरी त्यांनी राज्यभर दौरे करताना स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी खबरदारी घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज भरल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्या बारामती मतदारसंघाचा दौरा केला.
हर्षवर्धन पाटील, डॉ. पतंगराव कदम या माजी मंत्र्यांनाही मतदारसंघांत ठाण मांडून बसावे लागले.