शिक्षण, उद्योग, पर्यटन,शहरांचा विकास, रोजगार, पाणीपुरवठा आदी विषयांना नवा आयाम देताना महाराष्ट्र आणि मराठी माणूस डोळ्यासमोर ठेवत जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प सोडणारी बहुचर्चित ‘ब्लू प्रिंट’ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यास सादर केली.
यावेळी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वायत्तता मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अशीच भूमिका नरेंद्र मोदी यांनी मांडलेली असल्यामुळे आता पंतप्रधान म्हणून ते महाराष्ट्राच्या स्वायत्ततेच्या मागणीला विरोध करू शकणार नाहीत, असेही रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.
मनसेच्या स्थापनेच्यावेळी शिवाजी पार्क येथील पहिल्या जाहीर सभेत महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखडय़ाची संकल्पना राज यांनी मांडली होती. राज म्हणाले की सत्तेत असलेली आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या युतीच्या विकासाच्या संकल्पनांची चर्चा होण्याऐवजी मनसेच्या ब्लू प्रिंटची चर्चा होते यातच मनसेविषयी लोकांच्या असलेल्या अपेक्षा दिसून येतात. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या पन्नास वर्षांचा विकास लक्षात घेऊन ब्लू प्रिंट तयार केल्याचे राज यांनी सांगितले. अन्य पक्षांच्या जाहीरनाम्याप्रमाणे हा आराखडा नसून गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून तसेच अनेक अर्थतज्ज्ञ आणि समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून हा विकासाचा आराखडा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
जगात जे काही चांगले आहे ते महाराष्ट्रात असले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. विकास करताना सौदर्याची दृष्टी असणे आवश्यक असल्याने  लोकांचाही सहभाग यात अपेक्षित असल्याचे राज म्हणाले. मनसेच्या या ब्लू प्रिंटची वेबसाईटही यावेळी प्रकाशित करण्यात आली. आदर्श मराठी शाळा, जगातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये मराठी विद्यापीठ असावे, जगातल्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा संस्कृती व कले विषयसी संशोधन व्हावे, मराठी बँकांच्या जगभरात शाखा व्हाव्या, असा संकल्प या विकास आराखडय़ात मांडण्यात आला आहे. प्रत्येकाला राज्यातील रोजगार केंद्रांमध्ये नाव नोंदण्याची सक्ती व तेथूनच नोकऱ्यांसाठी पाठविण्यात येईल असेही ते म्हणाले.
हक्काचे आणि परवडणारे घर देण्याचा संकल्प करताना यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकारच्याच माध्यमातून राबवली जाईल, असेही राज म्हणाले. एसआरए हे बिल्डरांचे कुरण बनले असून यातून राज्य शासनाला फुटकी कवडीही मिळत नाही तसेच खऱ्या गरीबांचे भलेही होत नाही. त्यामुळे एसआरए योजना ही यापुढे राज्य शासन राबवेल असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महिलांच्या नावावर घर अथवा जमीन विकत घेतल्यास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.  पोलिसांना म्हाडा व अन्य सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये प्राधान्य, पोलीस व्यवस्थेत आमुलाग्र बदल, सर्वाना आरोग्य, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल आणि , महाराष्ट्राला स्वत:चे रेल्वे मंडळ, वीज यंत्रणा स्मार्ट ग्रिडने जोडणे, शहरांचे विकेंद्रीकरण आणि नियोजनबद्ध विकास करताना मनसे सत्तेत आल्यास तो नवीन झोपडपट्टय़ांचा तो शेवटचा दिवस असेल असा निश्चयही विकास आराखडय़ात करण्यात आला आहे.
महाराष्ट्राला उद्योग राज्य म्हणून विशेष दर्जाचा आग्रह धरताना महाराष्ट्राच्या हितासाठी स्वतंत्र व्यापार धोरण असले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आला आहे. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असावे ही सांगताना जगातील सर्वात मोठे वाचनालय तेथे असावे असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
हे करण्याचा मानस
*झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकारच्याच माध्यमातून राबवली
*प्रकल्पग्रस्तांना शहरात मोफत घर आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी
*सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण
*प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे तसेच मराठी शिकणे बंधनकारक करताना दर्जेदार इंग्रजी शिक्षणावर भर
*महाराष्ट्रात रोजगार कार्ड देऊन मराठी तरुणांना प्राधान्याने रोजगारात सामावून घेण्यात येईल