राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्ताग्रहण करणार हे आता स्पष्ट झाल्यामुळे नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि स्वागतासाठी मंत्रालयात प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली आहे. नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता असून या शपथविधी सोहळ्याची तयारीही सुरू झाली आहे.
 विधानसभा निवडणुकीत १२३ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर येणार हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या सोबतीला शिवसेना असेल की राष्ट्रवादी, या पक्षांचा बाहेरून पाठिंबा असेल की सरकारमध्ये सहभाग असेल, मंत्रिमंडळाचा आकार छोटा असेल की मोठा, मंत्रिमंडळात कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी मंत्रालयात मात्र नव्या सरकारच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सोमवारी नव्या सरकारच्या शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला. तब्बल १५ वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेवर बसणार असल्यामुळे सरकाराचा शपथविधी भव्यदिव्य असेल, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक जमण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य शपथविधी सोहळ्यासाठी तीन ठिकाणांची तयारी सुरू केली आहे. थपथविधी सोहळ्यात २५ ते ३० हजार लोक येणार असतील तर हा सोहळा वानखेडे स्टेडियमवर करायचा. त्यापेक्षा अधिक लोक येणार असतील तर वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आणि छोटेखानी समारंभ होणार असेल तर विधानभवनाच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
 मंत्रिमंडळाचा शपथविधी कोठे आणि कधी करायचा याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र तोवर या तिन्ही ठिकाणी प्राथमिक तयारी करावी, अशा सूचना मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार पोलीस, महापालिका आणि राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या तिन्ही जागांची पाहणी केली.
 नव्या मंत्रिमंडळाच्या स्वागताच्या तयारीसाठी मुख्य सचिवांनी मंगळवारी सर्व सचिवांची बैठक बोलाविली असून त्यात प्रत्येक विभागाचा संक्षिप्त आढावा घेतला जाणार आहे. तसेच सरकारच्या पहिल्या अधिवेशनासाठी राज्यपालांच्या अभिभाषणाचीही तयारी केली जात असल्याचे समजते.

राज्यपालांचे सल्लागार आता नव्या भूमिकेत
राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाल्यानंतर राज्यपालांचे सल्लागार म्हणून सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल बैजल यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येईल. त्यामुळे बैजल यांचे काम संपणार असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे मुख्यमंत्र्याचे सल्लागार म्हणून बैजल यांना महाराष्ट्रातच ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.