गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेली चकमक तसेच नागपूरात मतदान केंद्रावर वीज पडल्याची घटना वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले असून मुंबईतील मतदानाचा टक्का वाढून ५५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. विधानसभेच्या २८८ जगांसाठी ३८४३ पुरूष तर २७६ महिला असे ४ हजार ११९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा ८ कोटी ३५ लाख ३८ हजार ११४ मतदार फैसला करणार होते. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले आहे. सर्वच पक्षांनी आणि उमेदावारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे मतदानादरम्यान मोठय़ाप्रमाणात संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे आयोगाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. काही किरकोळ घटना वगळता राज्यात सर्वत्र सुरक्षित मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुंबईतील मतदानात वाढ होऊन शहर जिल्हयात ५३.९६ तर उपनगरात ५६ असे साधारणत: ५५ टक्के मतदान झाले असून राज्यात मात्र ६४ ते ६६ टक्केपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे या अधिकाऱ्यांने सांगितले. राज्यात सर्वाधिक ७४.५१ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्य़ात झाले आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील मतदारांध्ये उत्साहाचा अभाव असला तरी गडचिरोली साखऱ्या नक्षलग्रस्त भागात  जोरदार म्हणजेच ७० टक्के मतदान झाले आहे.