राज्याच्या विकासाची खुंटलेली गती आणि हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका भाजपचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढतानाच, गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अकार्यक्षम असल्याचे म्हटले. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशभरातील राज्यांच्या यादीत सहाव्या स्थानापर्यंत खाली घसरला. सिंचनाचा अभाव आणि विजेची अनुपलब्धता यामुळे गेल्या काही वर्षांत राज्यातील १०,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये विकास करण्यासाठी भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राचा अवलंब करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. यूपीए सरकारच्या कार्यकाळात शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असतानाच, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्यापायी आत्महत्या केल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल आणि राज्याचा विकास करायचा असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापालट गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले.