शिवसेनेने स्वबळावर लढण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून रविवारी दिवसभर राज्यभरातील नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु होते. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. घटकपक्षांना सन्मानाने जागा मिळत नसतील, तर स्वबळावर लढण्याचा इशारा या पक्षांनी दिला आहे.  शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर उपनेते, संपर्क प्रमुख व वरिष्ठ नेत्यांची ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु झाले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेही सक्रिय झाले असून ‘युवा सेना’ कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तयारीला वेग देण्यात येत आहे. दरम्यान, स्वाभिमानी पक्षाचे शेट्टी व रासपचे जानकर यांनी ठाकरे यांची भेट घेऊन आपल्याला हव्या असलेल्या जागांसाठी आग्रह धरला. मात्र  अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याने सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची भावना झाली आहे. त्यामुळे युतीच्या भांडणात घटकपक्षही भरडले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जे मतदारसंघ हवे आहेत, ते मिळत नसतील, तर स्वाभिमानी पक्ष व रासप एकत्रितपणे लढण्याची तयारी करीत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे.