भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’ला भेट दिल्याने भाजप आणि शिवसेनेतील बेबनाव बराचसा कमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची गाडी रुळावर येण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसने गेल्या सोमवारी प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रचाराला उद्या सुरुवात होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. आघाडीचे नेते शिवसेना आणि भाजपातील घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून होते. महायुती तुटल्यास वेगळे लढण्याचा पर्याय दोन्ही काँग्रेससमोर होता व तशी तयारीही केली होती. पण भाजप अध्यक्षांनी युतीचे संकेत दिल्याने महायुती कायम राहणार हे जवळपास निश्चित झाल्याचे दोन्ही काँग्रेसचे नेते बोलू लागले आहेत.
निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाढत्या जवळकीबद्दल वेगळा अर्थ काढण्यात येत होता. पण मुंबई भेटीत अमित शहा यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवित भाजपचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली.
पितृपक्षापूर्वी आघाडी
पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या पितृ पंधरवडय़ापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा केली जाईल, अशी चिन्हे आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. जागावाटपात राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी केली असली तरी काँग्रेस १३० पर्यंत जागा सोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.