राष्ट्रवादी कांॅग्रेस नेते अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी विधानसभा उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखत न दिल्यामुळे नाईक निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र, बुधवारी मुंबईत झालेल्या मुलाखतींच्या वेळी मनोहर नाईकांनी स्वत ऐवजी आपला मुलगा जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक याला उमेदवारीसाठी मुलाखत घेण्यास पक्षश्रेष्ठींसमोर हजर केले.
उल्लेखनीय म्हणजे, मनोहर नाईकांचा पुतण्या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अ‍ॅड. निलय नाईक यांनीही पुसदमधूनच उमेदवारी मागितल्याने नाईक घराण्यातील अंतर्गत वादही चव्हाटय़ावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. निलय नाईकांना उमेदवारी मिळाली नाही तर ते आपल्या काकांविरोधात बंडखोरी करू शकतात, हा पूर्वानुभव असल्याने निलय नाईकांनी दिलेल्या मुलाखतीची जोरदार चर्चा आहे. यवतमाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजारिया यांनी मुलाखत दिली आहे. राष्ट्रवादीकडे त्यांचाच एकमेव अर्ज होता. विशेष हे की, या जिल्ह्य़ातील सातही विधानसभा मतदारसंघांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीने घेतल्या. यामुळे कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादीबद्दल कुणकुण सुरू झाली आहे. आघाडीत राष्ट्रवादीला या जिल्ह्य़ात ७ पकी किमान ३ जागा हव्या आहेत. सघ्या राष्ट्रवादीकडे केवळ १ जागा आहे. यवतमाळची जागा राष्ट्रवादीला सुटू शकते, असा राष्ट्रवादीला विश्वास आहे.
.. तर नाईक भाजपकडे?
मनोहर नाईकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली नाही आणि त्यांचा मुलगा ययातीला उमेदवारी मिळाली नाही, तर कदाचित ते भाजपकडे जाऊ शकतील, अशी चर्चा आहे. विशेष हे की, आमदार संदीप बाजोरिया यांच्या समर्थकांनी आज बालाजी मंदिरात निवडणूक प्रचारांचा नारळ फोडला. उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण यवतमाळातून निवडणूक लढणारच, असे त्यांनी जाहीर केले.