विधानसभेच्या निवडणुकीत माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करताना ‘सामना-निश्चिती’ केल्याची जोरदार चर्चा आहे. अनेक मातब्बर इच्छुक असतानाही त्यांनी तिसऱ्या फळीतील कार्यकत्रे उमेदवार म्हणून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून अनेक मतदारसंघांत हे उमेदवार चक्क चौथ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता आहे.
विखे व थोरात यांच्या गटबाजीने जिल्ह्य़ात काँग्रेसची मोठी अधोगती झाली. त्यातच जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे हे ‘मातोश्री’वर जाऊन परतले. आता ते पक्षात असले तरी जिल्ह्य़ात मात्र त्यांचा वावर दिसत नाही. केवळ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारात ते व्यस्त आहेत. पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निवडणुकीत अत्यंत विदारक अनुभव आला. निवडणूक काळात शहराध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी राजीनामा दिला. नेतृत्वाशिवाय भरकटलेली काँग्रेस जिल्ह्य़ात प्रथमच बघायला मिळत आहे. मंत्री थोरात व विखे हे दोघेही मतदारसंघात ठाण मांडून असून अन्यत्र प्रचारासाठी गेलेले नाहीत.
आता पक्षाने समन्वयक म्हणून विनायक देशमुख व उबेद शेख यांची नेमणूक केली आहे.मागील निवडणुकीत जिल्ह्य़ात काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. पण आता दोन्ही नेत्यांच्या सामना-निश्चितीमुळे किती जागा मिळतात हा प्रश्न आहे.
निश्चितीचे राजकारण
*अकोलेतून सतीष भांगरे यांना उमेदवारी. भांगरे हे आळंदी येथे व्यवसायानिमित्त राहतात. त्यांनी सेना, भाजपकडे उमेदवारी मागितली होती. ती मिळाली नाही म्हणून काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिली.
*नेवाशात काँग्रेसने राजकीय ताकद दिलेले बाळासाहेब मुरकुटे भाजपमध्ये गेले. ते विखेंचे मानले जातात. पण त्यांच्या पक्षांतरामुळे दिलीप वाकचौरेंना काँग्रेसने उमेदवारी दिली.
*पारनेरमध्ये शिवाजी जाधव यांना उमेदवारी. मात्र तेथे पक्षाचे माजी आमदार नंदकुमार झावरे, त्यांचे चिरंजीव राहुल तसेच काशिनाथ दाते, माधव लामखेडे हे उभे केले नाहीत. आता लामखेडे हे अपक्ष आहेत. दाते व लामखेडे हे राष्ट्रवादीचे असले तरी काँग्रेसकडून इच्छुक होते.
*राहुरीमध्ये अमोल जाधव, शेवगाव-पाथर्डीत अजय रक्ताटे, कर्जत-जामखेडमधून किरण ढोबे, श्रीगोंद्यात हेमंत ओगले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार नवखे आहेत.