महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून राज्याच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ सादर होण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहीला असताना ठाण्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र पदांच्या निवडीवरुन सुरु झालेल्या वादातून थेट मुद्दयावरुन गुद्दयावर येत आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर चढाई करण्याचा पराक्रम करुन दाखविला. एकापेक्षा अधिक पदे मिरविणाऱ्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना आपले अतिरीक्त पद सोडावे लागेल अशास्वरुपाच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सुरु केल्या आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर चाल करत शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या नावाने अक्षरश लाखोल्या वाहील्या. काही कार्यकर्ते तेथील वस्तूंची मोडतोड करण्याच्या प्रयत्नातही होते.  विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना नेमकी कुणाची फुस होती यावरुन आता मनसेत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असून निवडणुका तोंडावर असतानाही ‘हो हे शक्य आहे’ याचा एकप्रकारे निर्वाळा दिला आहे.  
मनसेचे ठाणे शहराध्यक्ष नीलेश चव्हाण आणि उपशहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यात पदे हटविण्यावरून सुरु झालेल्या वादातून हा प्रकार घडला. ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गटा-तटाचे राजकारण सुरू आहे.  एका पदाधिकाऱ्याकडे दोनपेक्षा अधिक पदे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर होता. त्यामुळे ठाणे शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी पक्षात एकापेक्षा अधिक पदे मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यासंबंधीचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे पाठविला.
जादा पदे मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडील अतिरीक्त पदे काढून घेऊन ती नव्या कार्यकर्त्यांना द्यावीत, असे अहवालात म्हटले आहे. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी धडक मोर्चा नेला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाची मोडतोड करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी जमावबंदी आदेश झुगारल्याचा गुन्हा दाखल केला असून रात्री उशीरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.
दरम्यान, याप्रकरणी उपशहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ऐन निवडणूकीच्या तोंडावर एकापेक्षा जास्त पदे भुषविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेण्यासंबंधी नीलेश चव्हाण यांनी दिलेला अहवालामुळे कार्यकर्ते नाराज होऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवे, असे मत नोंदविले.