24 October 2020

News Flash

मोदी पंतप्रधान होण्यातील निम्मे श्रेय काँग्रेसचे – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांसाठी रविवारी घेतलेल्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीकास्त्र सोडले.

| October 13, 2014 02:15 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांसाठी रविवारी घेतलेल्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीकास्त्र सोडले. मोदींच्या पंतप्रधान होण्यामध्ये निम्मे श्रेय काँग्रेसचे आहे, अशी उपरोधिक टीका करून, बलात्काराचा सल्ला देणारे आर.आर. पाटील हा राष्ट्रवादीचा ‘स्वच्छ चेहरा’ आहे का, असा बोचरा प्रश्न त्यांनी विचारला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून राज ठाकरे यांची घेतलेली भेट हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र राज ठाकरे यांनी मलबार हिल येथे घेतलेल्या प्रचारसभेत भाजपला लक्ष्य केले. ज्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार सापडत नाहीत, तो भाजप बहुमत द्या अशी मागणी करतो आहे. या पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून ६० उमेदवार घेतले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवारही भाजपकडून लढत आहेत, अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यात त्यांचा स्वत:चा आणि भाजपचा प्रत्येकी २५ टक्के वाटा आहे, मात्र उरलेला ५० टक्के वाटा लोकांच्या काँग्रेसविरोधाचा आहे, असे ते म्हणाले.
बलात्कार करायचा असेल, तर निवडणुकीनंतर करा, असा जाहीर सल्ला देणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील हा राष्ट्रवादीचा स्वच्छ चेहरा असेल, तर पक्षाचे वाईट चेहरे कसे असतील, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. राष्ट्रवादीच्या एका जाहिरातीत ‘पाहतो, बघतो, निर्णय घेतो’, असे शब्द वापरण्याची आपली पद्धत नसल्याचे अजित पवार म्हणतात. हे खरे आहे, कारण त्यांच्या शब्दकोशात ‘लुटतो, ओरबाडतो’, असे शब्द असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. मनसेनेच महाराष्ट्राचा ‘विकास आराखडा’ तयार केला असून आमच्याकडेच राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:15 am

Web Title: mns chief raj thackeray election rally at mumbai
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 अबब! एकाच घरात ७६ मतदार?
2 महाराष्ट्र लुबाडणाऱ्यांना जागा दाखवा!
3 ‘इथे निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्ते रोजंदारीने मिळतील’
Just Now!
X