गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकून राजकीय अभ्यासकांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा फुगा यावेळी फुटला आहे. गेल्या इतक्या जागा जिंकण्यातही मनसेला यश मिळाले नसून, मुंबईसह नाशिक आणि पुणे या बालेकिल्ल्यात सर्वच ठिकाणी मनसेचे पुरती पिछेहाट झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका मानण्यात येतो आहे. विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे मनसेच्या राज्यातील वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मनसेने राज्यातील २१९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. स्वतः राज ठाकरे यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, पुणे या सर्वच ठिकाणी प्रचारसभा घेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह भाजपवरही टीका केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंटही पक्षाने यावेळी निवडणुकीपू्र्वी सादर केली होती. मात्र, या सगळ्याला मतदारांनी पाठिंबा दिल्याचे दिसत नाही. गेल्यावेळी ज्या भागातून मनसेचे उमेदवार विजयी झाले होते. तिथे सर्वच ठिकाणी यंदा पक्षाची पिछेहाट झालेली दिसते. यावेळी शिवसेना, भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, याचा थेट फायदा घेण्यात मनसेचे उमेदवार अपयशी ठरले. कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार नाही, स्वतंत्रपणे प्रत्येक निवडणूक लढविणार, अशी राज ठाकरे यांची पहिल्यापासून भूमिका आहे. त्याचाही फटका त्यांना बसल्याचे राजकीय अभ्यासकांना वाटते.
मुंबई-नाशिकमध्ये मनसेला धक्का-
० माहिममध्ये मनसेच्या नितीन सरदेसाईंचा पराभव, शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी
० शिवडीमध्ये बाळा नांदगावर यांचा पराभव
० नाशिकमध्ये वसंत गिते यांचा पराभव

जुन्नरमध्ये मनसेचे शरद सोनावणे विजयी