नाशिक महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेला मदत केली. या मदतीची भरपाई २००९च्या निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत व्हावी, अशी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची मनोमन इच्छा आहे. मनसेचे इंजिन वेगाने पळाल्यास मुंबई, ठाण्यात फायदा होऊ शकतो, असे सत्ताधाऱ्यांचे गणित आहे.
नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसेला पाठिंबा म्हणजे नव्या राजकीय समीकरणाची नांदी, अशी चर्चा सुरू झाली. पण मनसेला मदत करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर झाला असून, त्याचा प्रदेश पातळीवर काहीही संबंध नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केला.
नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचे अशोक मुर्तडक (७५ मते) यांनी युतीचे सुधाकर बडगुजर (४४) यांना पराभूत केले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या गुरुमित बग्गा यांनी (७५ मते) मिळवत युतीचे संभाजी मोरुस्कर यांचा (४३) पराभव केला.
महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी घायकुतीला आल्याप्रमाणे इतर पक्षातील नगरसेवकांच्या फोडाफोडीचा उद्योग आरंभलेल्या शिवसेनेला या निकालाने चांगलीच चपराक बसली आहे.
महापौरपदाची ही निवडणूक नवीन राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरू शकेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. परंतु स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत दुखविणाऱ्या मनसेपासून दूर जाण्याचा निर्णय भाजपने घेतला. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक या पाश्र्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा आपला जुना सहकारी असलेल्या शिवसेनेकडे मैत्रीचा हात पुढे केला. कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे हे राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याशी सलगी करणार नाहीत, या भ्रमात राहिलेल्या शिवसेना-भाजप युतीला राज यांच्या भूमिकेने धक्काच बसला. अर्थात राष्ट्रवादीचे ‘कळत-नकळत’ सहाय्य राज यांनी पहिल्यांदा सत्ता ताब्यात मिळवितानाही घेतलेच होते. त्यावेळी राज यांच्या जाहीर टिकेमुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या भुजबळांसह इतर स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला मदत करण्यापर्यंत व्यूहरचना आखली होती. परंतु अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आलेल्या ‘राज’ कीय निरोपामुळे राष्ट्रवादीला तटस्थतेची भूमिका घ्यावी लागली अन् मनसेकडे राज्यातील पहिली महापालिका आली.  शिवसेनेकडून खा. संजय राऊत यांचे कट्टर समर्थक सुधाकर बडगुजर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार असता तर, निकाल वेगळा लागू शकला असता अशी कुजबूज आहे. वसंत गिते यांना या निवडणुकीने पुन्हा एकदा हात दिला आहे.