माझा पक्ष अन्य पक्षांपेक्षा वेगळा असेल,असे सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच अजूनही उमेदवार जाहीर न केल्यामुळे मनसेमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीतील पानिपत लक्षात घेऊन प्रचारात राज आघाडी घेतील ही अपेक्षाही फोल ठरल्यामुळे अनेक प्रमुख पदाधिकारी उमेदवारी घेण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे.
मनसेचे आमदार व गटनेते बाळा नांदगावर, कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण तसेच संजय घाडी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी हे विधानसभा निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागावाटप हा प्रमुख मुद्दा असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. तथापि दोनशे जागा लढण्याची भूमिका घेणारी मनसे आपल्या उमेदवारांची यादी जाहीर का करत नाही, असा सवाल मनसेचे कार्यकर्तेच परस्परांना विचारू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनसेच्या दहाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर राज ठाकरे पक्षबांधणीकडे लक्ष देऊन महाराष्ट्राचा दौरा करतील अशी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. तथापि औरंगाबादचा दौरा वगळता राज कृष्णभूवन मधूनही बाहेर न पडल्यामुळे निवडणुकीचा ‘निकाल’ स्पष्ट दिसत असल्याची चर्चा मनसेमध्येच सुरु आहे. मनसेचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांना शेवटपर्यंत उमेदवारी देणार की नाही, हे स्पष्ट न केल्यामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला असून दादर-माहीम मतदारसंघात मनसेच्या महिला नगरसेविकेला लाच घेताना अटक करण्यात आल्यामुळे दादरमधील वातावरणही मनसेच्या विरोधात गेले आहे. ‘ब्लू प्रिंट’ प्रसिद्ध करण्यास झालेला उशीर तसेच शेवटपर्यंत उमेदवार जाहीर करण्यास होत असलेल्या उशीरामुळे निवडणुकीला सामोर जायचे कसे हा प्रश्न मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडलेला दिसतो. शिवसेना-भाजपकडे नेत्यांच्या फळ्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतरही महाराष्ट्रात जागोजागी दौरे केले तर भाजपचे प्रमुख मंत्री आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडेही नेत्यांची वानवा नाही. या पाश्र्वभूमीवर, एकखांबी तंबू असलेल्या मनसेच्या प्रचाराची धुरा केवळ राज यांनाच वाहावी लागणार असून प्रचाराला मिळणाऱ्या थोडय़ाशा कालावधीत ते एकटे काय काय साध्य करणार असा प्रश्नही मनसेतून उपस्थित होत आहे.
आज ब्लू प्रिंट प्रसिद्ध होणार
मनेसेची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट उद्या गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वाची साथ हवी अशी साद राज यांनी माध्यमांना पाठविलेल्या पत्रकामध्ये घातली आहे.