मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बाळा नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढणार की नाही हे गुलदस्त्यात असताना मनसेने ७१ उमेदवारांची दुसरी यादी आज सायंकाळी जाहीर करण्यात आली. मनसेने एकूण २२४ जागी उमेदवार उभे केले असून शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेच्या या दुसऱ्या यादीमध्ये वांद्रे पश्चिम विधानसभेतून तुषार आफळे, ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण, कल्याण ग्रामीणमध्ये विद्यमान आमदार रमेश पाटील तसेच कुलाबा येथून अरविंद गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मनसेचे गटनेते व आमदार बाळा नांदगावर यांच्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार हे अद्यापि जाहीर करण्यात आले नसून नांदगावकर यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय नांदगावकर यांनी घेतला होता. मनसेच्या पहिल्या यादीत १५३ जणांना उमेदवारी देण्यात आली तर आज ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
ठाण्यातील कोपरी पाचपाखडी येथून सेजल कदम तर विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कळवा-मुंब्रा येथून महेश साळवी यांना उमेदवारी देण्यात जाहीर करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम येथे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार व काँग्रेसचे बाबा सिद्दिकी यांच्या विरोधात मनसेचे विभाग अध्यक्ष तुषार आफळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी शेलार यांच्या विरोधात मनसेने उमेदवार उभा केला नव्हता. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विरोधात मनसेने उमेदवार उभा केला नाही अशी टीका झाली होती. आता भाजपच्याही बहुतेक जागी मनसेने आपले उमेदवार उभे केले असून सर्वशक्तिनीशी निवडणूक लढण्याचा निर्धार मनसेने केला आहे.