पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सुमारे चारशे पत्रकारांशी दिवाळसणाच्या निमित्ताने संवाद साधून नवीन पायंडा पाडला. पत्रकारांसाठी खास ‘दिवाली मीलन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात तब्बल एक ते सव्वा तास उपस्थित राहिलेल्या मोदी यांनी प्रादेशिक प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांशी त्यांच्याच भाषेत ‘कसे आहात’ अशी विचारणा करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रसारमाध्यमांची शक्ती खूप मोठी आहे. पत्रकार त्यांच्या लेखणीतून साफसफाईचे काम करीत आहेत, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. ‘स्वच्छ भारत’ अभियानात प्रसारमाध्यमांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याबद्दल मोदींनी आभार मानले.
मोदी म्हणाले की, देश बदलण्यासाठी प्रसारमाध्यमांचंी भूमिका महत्त्वाची आहे. स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित विषयाला माध्यमांनी अलीकडच्या काळात महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक पत्रकार लिहीत आहेत; परंतु त्यांनी आता स्वत:ची लेखणी झाडूमध्ये परावर्तित करून साफसफाईचे काम सुरू केले आहे. कधी काळी भाजप मुख्यालयात मी तुमच्यासाठी खुच्र्या लावत होतो, असे मोदींनी सांगताच पत्रकारांमध्ये हास्याची लकेर उमटली. प्रसारमाध्यमांकडून अनेक गोष्टी शिकता येतात. पत्रकारांशी सतत संवाद साधत राहण्याचे आश्वासन मोदींनी दिले. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ‘सरकार सर्व करेल’ अशी धारणा होती. ही धारणा आता बदलली आहे. त्यात प्रसारमाध्यमांची मोठी भूमिका असल्याचे नमूद करून मोदी यांनी पत्रकारांचे आभार मानले. या वेळी भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, महाराष्ट्राचे प्रभारी जे.पी. नड्डा उपस्थित होते.