अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या प्रश्नाबाबत कृती करण्यास सरकारकडे २०१९ पर्यंत मुबलक वेळ आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. सरकारचे प्राधान्यक्रम आहेत आणि त्याप्रमाणे सरकार काम करील, सरकारकडे २०१९ पर्यंत मुबलक वेळ आहे, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे.
देशाच्या कार्यक्रम पत्रिकेवर राम मंदिराचा प्रश्न आहे, ते देशहिताचे आहे, विश्व हिंदू परिषद आणि अन्य धार्मिक नेत्यांना राम मंदिर बांधण्यासंदर्भात आमचा पाठिंबा आहे, असेही होसबळे म्हणाले.
केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यास राम मंदिर उभारणीचा कायदा करता येण्याचा मार्ग सुकर होईल, असे भाजपने म्हटले होते, त्याकडे होसबळे यांचे लक्ष वेधले आणि संघही तशीच मागणी करणार का, असे विचारले असता होसबळे म्हणाले की, राम मंदिराचा प्रश्न निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आहेच.
अल-कायदा आणि इसिस यांच्याकडून असलेल्या धोक्याबाबत विचारले असता होसबळे यांनी, राष्ट्रीय सुरक्षेबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले, मात्र चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला. संघाच्या बैठकीत आर्थिक अथवा राजकीय ठराव पारित करण्यात आला का, असे विचारले असता होसबळे म्हणाले की, नवे सरकार अलीकडेच आले आहे, प्रथम त्या सरकारची कामगिरी आम्ही पाहू.