नरेंद्र मोदींच्या आधीसुध्दा भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला भेटी दिल्या आहेत. परंतु, तेव्हा त्या त्या पंतप्रधानांच्या मातृभाषेत अमेरिकेच्या अध्यक्षांनी कधीच त्यांचे स्वागत केले नाही. यावेळी मात्र ओबामांनी भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत ‘केम छो’ म्हणून कसे केले, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. जगात भारताच्या पंतप्रधानांची ओळख ही भारताचे पंतप्रधान म्हणून नाही तर ‘गुजराती पंतप्रधान’ म्हणून आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. विकसित देशांतील नेते त्यांना भेटायला येणा-या पाहुण्यांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करतात, ‘केम छो’ हे त्याचेच प्रत्यय असल्याचा भाग आहे, असंही ते पुढे म्हणाले. ‘लोकसत्ता – आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुका, मराठीचा मुद्दा, विदर्भ, युती-आघाडीचे राजकारण अशा अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

राज ठाकरे यांच्यासोबतच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमातील ठळक मुद्दे;
* नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत आणि कामाचा झपाटा मला आवडतो.
* देशाच्या पंतप्रधानासाठी देशातील सर्व राज्ये समान असली पाहिजेत. त्यांनी राज्या-राज्यांमध्ये तुलना करू नये.
* पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी देशाचा विचार करायला हवा.
* नरेंद्र मोदी शंका निर्माण होतील अशा प्रकारची वक्तव्य करतात.
* स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याबाबत नरेंद्र मोदींच्या बोलण्यामध्ये दुटप्पीपणा दिसतो.
* पंतप्रधानांच्या प्रचाराशी मला काही देणं घेणं नाही, परंतु देशाच्या सीमेवर भारतीय जवान शहीद होत असताना हा मुद्दा गंभीर आहे.
* मनसेकडून लोकांच्या खूप अपेक्षा.
* ११ कोटींच्या महाराष्ट्रात साडेनऊकोटी मराठी राहतात. त्यामुळे येथे मराठीचा मुद्दाच महत्त्वाचा.
* प्रादेशिक अस्मिता जपणारा मनसे हा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष.
* मनसेची सत्ता आली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार.
* मुंबईतील मराठी टक्का कमी झाल्याचा दोष शिवसेनेला देता येणार नाही.
* महाराष्ट्राच्या विकासाचं श्रेय यशवंतराव चव्हाणांना. त्यांनी उद्योगधंद्यांसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण केलं.
* महाराष्ट्राच्या विकासामध्ये शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांचाही मोलाचा वाटा.
* परप्रांतियांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवली.
* विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचं काहीच काम नाही. निवडणुकीत माझ्यासाठी मराठीचा मुद्दाच महत्त्वाचा.
* माझा पाठिंबा हा मोदींना आहे, माझा भाजपला पाठिंबा नाही.
* मोदी जेव्हा पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी निवडणूक लढवली नव्हती, त्यांना पक्षाने त्या पदावर बसवले.
* मोदी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायच्या आधी त्यांचा पक्ष अस्तित्त्वात होता. माझा पक्ष मी स्वत: उभा केलाय.
* मी निवडणूक लढवतो तेव्हा बहुमतासाठी निवडणूक लढवतो.
* गोपानाथ मुंडेंच्या मुख्यमंत्री व्हायच्या महत्त्वाकांक्षेनंतर युतीमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाली.
* पक्ष स्थापनेनंतर तीन वर्षातच माझ्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळालं हे माझ्या पक्षाचं यश आहे.
* वेगळा विदर्श ही तिथल्या नेत्यांची मागणी आहे जनतेची नाही.