लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी हे ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगत होते. पंतप्रधान झाल्यानंतर मात्र कांदा भाव घसरणीचा विषय असो, वा चीनने मध्यंतरी केलेली घुसखोरी अथवा पाकिस्तानकडून सध्या सुरू असलेला गोळीबार असो. प्रत्येक महत्वपूर्ण विषयात आता ते ‘जल्द ठीक होगा’ असे सांगत आहेत. अवघ्या काही महिन्यांत या पध्दतीने मोदींची भाषा पूर्णपणे बदलली असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
चीनचे राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर आले असतानाच चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केली. या परिस्थितीत चीनच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान मोदी हे शांततेत चर्चा करत होते. जागतिक पातळीवर मोदींना आपली प्रतिमा खराब करायची नव्हती. यामुळे त्यांनी घुसखोरीच्या विषयाकडे दुर्लक्ष केले.
देशाच्या इतिहासात आजवर कधी असे घडले नव्हते, असे राहुल यांनी नमूद केले. भाजपचे सरकार केवळ व्यापारी व उद्योजक धार्जिणे धोरण राबवत आहे. काँग्रेस सरकारने शासकीय अनुदानाची रक्कम थेट गोरगरिबांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित केली. भाजप सरकार जनतेचा निधी उद्योजकांच्या खिशात घालण्याची योजना राबवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव, मात्र दिल्लीत तो ग्राहकाला महागात खरेदी करावा लागतो. मग फायदा कोणाचा होतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. स्वातंत्र्यापासून आजतागायत झालेली प्रगती नजरेआड करत काँग्रेसने ६० वर्षांत काय केले असा प्रश्न भाजप करत आहे.
रस्ते, वीज, औद्योगिक विकास, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. काँग्रेस शासनाने सर्वाच्या सोबतीने शांततेने हे राज्य प्रगतीपथावर नेले. या स्थितीत पंतप्रधान महाराष्ट्राचे गुजरात करणार असल्याचे सांगत आहेत. त्यांना महाराष्ट्र गुजरातच्या पुढे देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे माहित नसल्याचा टोला राहुल यांनी लगावला.