भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्रासाठी चित्रपटसृष्टीतील खलनायक ‘स्पॉट नाना’ ठरले असून शिवसेना व भाजपची पंचवीस वर्षांची युती सत्तेच्या मस्तीत तोडण्याचे पाप अमित शहा व त्यांच्या टोळीने केले आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी केली आहे.  दक्षिणेतील खलनायकाचा रोल करणारे रामा रेड्डी यांनी प्रतिबंध चित्रपटात ‘स्पॉट नाना’ची भूमिका केली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही महायुती तोडण्यात स्पॉट नानाची भूमिका बजाविल्याचे मोहन रावले म्हणाले. भाजपसारखा स्वार्थी पक्ष दुसरा होणार नाही. आपली ताकद वाढते आहे हे दिसताच त्यांनी संपूर्ण देशात सहकारी पक्षांशी दगाबाजी केली आहे. दिल्लीतील पाताळयांत्री  नेत्यांनी युती तोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, असा आरोप लालबाग-परळ येथील शिवसेनेच्या प्रचारसभेत रावले यांनी केला.