भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यावर उभयतांकडून परस्परांवर कुरघोडी करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झाला असला तरी मुंबईतील बहुतांशी मतदारसंघांमध्ये  या दोन विभक्त झालेल्या मित्रांमध्येच मुख्यत्वे लढत झाली आहे. मराठी, गुजराती, उत्तर भारतीय तसेच अन्य भाषकांचा पाठिंबा मिळविण्यात भाजपचे उमेदवार यशस्वी झाल्याचे चित्र होते. शहरात आमचेच सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत.  
मुंबईतील निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती, अशी मतविभागणी करण्याचा प्रयत्न झाला. मोदी-शहा असा वारंवार उल्लेख करीत मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला. मराठी मतदारांमध्ये काही प्रमाणात मराठी अस्मिता जागृत झाली होती. पण प्रत्यक्ष मतदान तशा पद्धतीने झाले नसावे, असा अंदाज आहे. कारण भाजपला काही प्रमाणात मराठी मतदारांनी मतदान केलेले दिसते. भाजपला मराठी मतदारांबरोबरच गुजराती, उत्तर भारतीय अशा सर्वच समाज घटकांचा पाठिंबा मिळाल्याचे चित्र होते. उत्तर भारतीयांची मते मुंबईत महत्त्वाची ठरतात. ही मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळत असत. यंदा उत्तर भारतीयांनी भाजपला जास्त पसंती दिल्याचे चित्र आहे. उत्तर भारतीयांच्या वस्त्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. तुटलेली युती आणि भाजप नेत्यांनी हिणवल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांनी विजयासाठी झटून काम केले. मुंबईत विजयासाठी फक्त मराठी मतांचे पाठबळ पुरेसे ठरत नाही. आतापर्यंत युतीमुळे अन्य भाषकांची मते मिळत असत. यंदा फक्त मराठी मतांवरच शिवसेनेची मदार होती. त्यातच काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या मतांचे मनसेमुळे विभाजन झाले. लोकसभेप्रमाणे गुजराती मतदार मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडले नसले तरी जे मतदार बाहेर पडले त्यांचा कल भाजपकडेच होता. शिवसेनेच्या परडय़ात गुजराती आणि उत्तर भारतीयांची काही अपवाद वगळता मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले नसावे, असा अंदाज आहे.
गेल्या दोन निवडणुकांध्ये काँग्रेसची मुंबईत चलती होती. लोकसभेतील दारुण पराभवापासूनच काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास गमाविला होता. आजही काँग्रेसचे उमेदवार, नेते वा कार्यकर्त्यांमध्ये तेवढा उत्साह दिसत नव्हता. आपली पारंपारिक मते मिळावीत, असा प्रयत्न सुरू होता. पण उत्तर भारतीयांची हक्काची मते यंदा गमवावी लागल्याची कबुली काँग्रेस नेत्यांनी दिली. मनसेच्या गोटात फार काही उत्साहाचे वातावरण नव्हते.
मुंबईत भाजपलाच चांगले यश मिळेल आणि सर्वाधिक उमेदवार निवडून येतील.
-विनोद तावडे, भाजप नेते