News Flash

निवडणुकीतील नारायण: अवघे ८४ वयोमान!

आता कार्यकर्त्यांची चौथी पिढी कार्यरत असली तरी शिवसेना म्हटलं की वीस-पंचविशीतला तरुणच डोळ्यासमोर येतो. कारण साठच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असणारी पिढी आता वृद्धापकाळाने सक्रिय

| October 12, 2014 03:20 am

आता कार्यकर्त्यांची चौथी पिढी कार्यरत असली तरी शिवसेना म्हटलं की वीस-पंचविशीतला तरुणच डोळ्यासमोर येतो. कारण साठच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असणारी पिढी आता वृद्धापकाळाने सक्रिय चळवळीपासून दूर झाली आहे. ठाण्यात मात्र या पिढीतले अवघे ८४ वय असणारे उद्धव जगताप हे शिवसैनिक आताही तरुणांच्या खांद्याला खांदा लावून शाखेत वावरताना दिसतात. lok10‘मार्मिक’मधील व्यंगचित्र आणि लेख वाचून ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले. ते स्वत:ला खूप भाग्यवान समजतात, कारण बाळासाहेबांच्या घरी शिवसेनेची स्थापना करताना दस्तुरखुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांचा सभासदत्वाचा अर्ज भरून ‘मराठी माणसाच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठा’ असा त्यांना आशीर्वाद दिला.
उद्धव जगताप यांनी समवयस्क मराठी तरुणांना संघटित करून मुंबईत भांडुपमध्ये शिवसेनेची शाखा सुरू केली. नुकत्याच राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या शिवसेनेतर्फे मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्याची ऑफर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना दिली होती. मात्र नोकरदार उद्धव जगताप यांनी ती संधी नाकारली. पुढे विवाह झाल्यानंतर ते ठाण्यात स्थायिक झाले. तेव्हा मुंबईप्रमाणे ठाण्यातही शिवसेनेचे लोण पोहोचले होते. इथे आनंद दिघे आणि इतर तरुणांसोबत ते शाखेत काम करू लागले. ठाणे शहर शाखाप्रमुख म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते. ठाण्यातही निवडणुकीत भाग घेऊन राजकारणात शिरकाव करण्याची त्यांना संधी होती. मात्र जगताप कधीही त्या वाटेला गेले नाहीत. अनेकदा साठीपार झालेली मंडळी गतकाळाशी तुलना करून वर्तमानकाळाला दूषणे देत असतात. ‘आमच्या वेळी असे होते.. किंवा असे नव्हते’ असा सूर आळवीत असतात. जगतापांच्या बोलण्यात किंचितही तसली कुरकुर आढळत नाही. साठच्या दशकात ते ज्या तडफेने शाखेत जायचे, त्याच उत्साहाने ते आताही कार्यरत आहेत. वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ असल्याने निवडणूक काळात त्यांच्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी असते. प्रचाराच्या काळात सर्व शाखांना भेटी देणे, तिथे काय हवे-नको ते पाहणे ही कामे ते उत्साहाने करीत असतात. विविध भागांत फिरून पक्षासाठी सर्वेक्षणे करतात. कानाकोपऱ्यात फिरून खात्रीच्या विजयांच्या आणि अडचणीतल्या जागांवर लक्ष ठेवतात.
व्होल्टास कंपनीत ३४ वर्ष नोकरी करून ते निवृत्त झाले. शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेला समाजकारणाचा वसा मात्र त्यांनी अद्याप सोडलेला नाही. ठाण्यातील शिवप्रेरणा या संस्थेच्या माध्यमातून ते गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत करीत असतात. नव्या ठाण्यात ओवळा येथे ते राहतात. पहाटे चारला उठून पहिल्या बसने तलावपाळी येथे येऊन नियमितपणे योगासने करतात. आता ऐहिक स्वरूपाच्या कोणत्याही आशा-अपेक्षा नाहीत, पण अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून शाखेत कार्यरत राहायला मिळावे, इतकीच इच्छा असल्याचे ते सांगतात.                                           

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:20 am

Web Title: narayan in election 84 year old shiv sena activist
Next Stories
1 लक्षवेधी लढती
2 महाराजकारणी: नरेंद्रमहाराज
3 देशाचे चित्र पालटण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
Just Now!
X