विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव वर्मी लागलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी मौन सोडून स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेतले. कार्यकर्त्यांपर्यंत पैशांची रसद पोहोचली नाही आणि ही रसद पुरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते, त्यामुळे काँग्रेसच्या पराभवाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार असल्याचे राणे यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवले. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्यात चातुर्याचा अभाव असल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली. सभागृहात नसलो तरी बाहेर राहून विरोधी नेत्याची भूमिका बजावित राहणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
प्रचाराच्या काळातच काही स्वपक्षीय नेत्यांनी निवडून येणार नाही, असे भाकित वर्तविले होते. पक्षाच्या उमेदवारांना पैसे व अन्य रसद पोहचली नाही. उमेदवारांना पैसे, साधनसामग्री पोहचविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे आपले विधान होते याकडे लक्ष वेधले असता राणे यांनी आपल्याला आधीच अंदाज आला होता, असे स्पष्ट केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लवकरच भेटून पराभवाची कारणे सांगणार आहे. पराभवास कोण जबाबदार हे नाव मी घेणार नाही, पण तुम्ही काय समजायचे ते समजा, असेही राणे म्हणाले.

..तर राजीनामा द्या
महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडणे अपेक्षित असताना, राज्याचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांनी अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान  राणे यांनी फडणवीस यांना दिले आहे.उद्योगमंत्रीपदी प्रकाश मेहता यांची नियुक्ती केल्याने औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागे राहावा हा उद्देश असल्याचा आरोप राणे यांनी केला. फडणवीस हे दिल्लीच्या कलाने निर्णय घेणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काही वेगळे नाही, असे त्यांनी स्वत:च्या अनुभवातून सांगितले.

भाजपने एवढा अवमान करूनही शिवसेनेला सत्तेत जाण्याची घाई झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी साऱ्यांना लाथाडले असते. पण उद्धव ठाकरे यांना स्वार्थासाठी सत्तेत भागीदारी हवी आहे. भाजपला अफझल खानाच्या फौजेची उपमा प्रचाराच्या काळात दिली आणि त्याच फौजेत शिवसेना सामील होत आहेत.  – नारायण राणे, काँग्रेस नेते

भाजप-राष्ट्रवादीवर टीका
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता भाजप सरकारमध्ये नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू, सौम्य स्वभावाचे असले तरी मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या चातुर्याचा त्यांच्यात अभाव आहे. एकनाथ खडसे वगळता एकही मंत्री प्रभावी नाही. टोल बंद करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी प्रचाराच्या काळात दिले होते. पण आता त्यांनी भूमिका बदलल्याचे राणे यांनी निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादीने केवळ स्वसंरक्षणार्थ भाजप सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. उभय पक्षांमध्ये सारे ठरवून चालले आहे, असा आरोपही  राणे यांनी केला.